खाजगीकरणाविरोधात टपाल कर्मचारी संपावर
By सूरज पाचपिंडे | Published: August 10, 2022 03:06 PM2022-08-10T15:06:24+5:302022-08-10T15:06:33+5:30
कोरोनाने मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटूंबियांना १० लाख रुपये भरपाई देण्यात यावी, तसेच एका वारसास अनुकंपा भर्तीवर खात्यात नोकरी द्यावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.
उस्मानाबाद : खाजकीकरण बंद करावे, यासह इतर मागण्यांसाठी अखिल भारतीय टपाल कर्मचारी संघटनेने बुधवारी एकदिवशीय देशव्यापी संप पुकारला होता. जिल्ह्यातील शेकडो टपाल कर्मचारी संपात सहभागी झाल्याने टपाल विभागाचे कामकाज विस्कळीत झाले आहे.
डाक मित्र योजना व कॉमन सर्व्हिस सेंटरच्या माध्यमातून टपाल खात्याच्या खाजगीकरणाचे धोरण थांबवावे, बचत बँक योजनेचे आयपीपीबीमध्ये विलीनीकरण करण्याचा प्रस्ताव रद्द करावा, नवी पेन्शन योजना रद्द करुन जुनी पेन्शन योजना लागू करावी, रिक्त जागा भरण्यात याव्यात, कोरोनाने मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटूंबियांना १० लाख रुपये भरपाई देण्यात यावी, तसेच एका वारसास अनुकंपा भर्तीवर खात्यात नोकरी द्यावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.
संपामध्ये अखिल भारतीय टपाल कर्मचारी संघटनेचे विभागीय सचिव कॉम्रेड महेश वाघमोडे, अध्यक्ष बाळासाहेब कदम, सुरेश जगदाळे, भीमराव पाटील, अमोल भोसले, गणेश गुरव, संतोष भोसले, विष्णू सुरवसे आदी कर्मचारी सहभागी होते. संपामुळे पोस्ट कार्यालयातील पासपोर्ट सेवा, आधार सेवा, बँकींग सेवा ठप्प होती. त्यामुळे नागरिकांचे हाल झाले.