धुळे- सोलापूर महामार्गावर खड्डे; डबक्यात केले मासे पकडो आंदोलन
By सूरज पाचपिंडे | Published: October 9, 2023 04:16 PM2023-10-09T16:16:32+5:302023-10-09T16:16:58+5:30
आंदोलकांची रस्त्याच्या बाजूला नाला करण्याची मागणी
धाराशिव : शहरातून गेलेल्या धुळे-सोलापूर महामार्गावर ख्वाँजा नगर नजीक मोठा खड्डा पडलेला आहे. रिमझीम पावसातही रस्त्यावर डबके साचून राहत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांसह वाहनधारक त्रस्त झाले आहेत. प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी परिसरातील नागरिकांनी सोमवारी रस्त्यावरील डबक्यात गळ टाकून मासे पकडो आंदोलन केले.
धाराशिव शहरातून गेलेल्या सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर मोठा खड्डा पडला आहे. रस्त्याच्या बाजूला नाला नसल्याने पाणी रोडवरच साचून राहत आहे. रस्त्यावरील पाण्याचा अंदाज न आल्याने दुचाकीचे अपघातही घडू लागले आहेत. प्रशासनाकडे तोंडी व लेखी मागणी करुन देखील त्या ठिकाणच्या रस्त्यावर काम झालेले नाही. प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी ख्वॉजा नगर भागातील नागरिकांनी खड्ड्यातील पाण्यात गळ टाकून अनोखे मासे पकडो आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी झालाच पाहिजे झालाच पाहिजे, रस्त्याच्या बाजूला नाला झालाच पाहिजे, अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. आंदोलनात सरफराज काझी, आरेफ रजवी, पठाण साजिद, आरेफ रजवी, सरफराज शेख, आसेफ शेख, कुनाल जाधव, आसेफ बागवान, हनुमंत कुमटे, नेहाल माने , वसीम मनियार, इजहान पठाण, सलीम शेख, बालाजी जठार, खलील सय्यद यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.