नऊ गावांच्या शिवारातील वीज पुरवठा खंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:33 AM2021-03-31T04:33:05+5:302021-03-31T04:33:05+5:30
पारगाव : वाशी तालुक्यातील पारगाव येथील ३३ के. व्ही. उपकेंद्रअंतर्गत येणाऱ्या ९ गावांतील शेतातील थ्रीफेज वीज पुरवठा महावितरण कंपनीने ...
पारगाव : वाशी तालुक्यातील पारगाव येथील ३३ के. व्ही. उपकेंद्रअंतर्गत येणाऱ्या ९ गावांतील शेतातील थ्रीफेज वीज पुरवठा महावितरण कंपनीने थकीत बिलापोटी खंडित केलेला आहे. त्यामुळे ऊस उत्पादकांसह पालेभाज्या व फळलागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
वाशी तालुक्यातील पारगाव ३३ के. व्ही. उपकेंद्रांतर्गत पारगावसह, जनकापूर, हातोला, जेबा, ब्रम्हगाव, पांगरी, पिंपळगाव (क), रुई, लोणखस या गावांच्या शेत शिवारातील शेतकऱ्यांना थ्री फेज वीज पुरविली जाते. मात्र, सध्या महावितरणने थकीत वीज बिलाची वसुली मोहीम सुरू केली असून, या शेतकऱ्यांकडे असलेल्या थकीत वीजबिल वसुलीसाठी २९ मार्चपासून वीज पुरवठा बंद करण्यात आला आहे. पारगाव व परिसरातील मांजरा नदीच्या पट्ट्यात ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात आहेत. पारगाव, रुई, पिंपळगाव (क), हातोला, जनकापूर, लोणखस, पांगरी, जेबा या गावात उसाचे क्षेत्र अधिक आहे. याच भागातील अनेक शेतकरी फळलागवड व पालेभाज्यांचेही उत्पादन घेतात. सध्या उन्हाची तीव्रता वाढत असल्याने दररोज पिकांना पाणी देणे गरजेचे आहे. मात्र, महावितरणने वीज पुरवठा खंडित केल्याने या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.