प्रविणसिंह परदेशी फेटा बांधून तयार; पण 'धाराशिव'मध्ये ठरेना महायुतीचा उमेदवार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2024 07:04 PM2024-03-25T19:04:24+5:302024-03-25T19:06:00+5:30
धाराशिव लोकसभा मतदारसंघातील जागेसाठी महायुतीतील शिवसेना-राष्ट्रवादी आणि भाजपा हे तिन्हीही पक्ष आग्रही आहेत
मुंबई/धाराशिव - शिवसेनेत फूट पडल्यानंतर अगोदर आमदार आणि नंतर खासदारांनीही पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची साथ सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिदेंसोबत जाणे पसंत केले. शिवसेनेच्या तब्बल १३ खासदारांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. मात्र, मुंबई वगळता धाराशिव आणि परभणीच्या खासदारांनी ठाकरेंप्रतीची निष्ठा जपली. त्यामुळेच, धाराशिवचे विद्यमान खासदार यांची लोकसभेची उमेदवारी सर्वात प्रथम जाहीर झाली आहे. शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दोन दिवस धाराशिवचा दौरा केला. यावेळी, ओमराजेंच्या उमेदवारीची घोषणा करत प्रचाराचा शुभारंभही केली. त्यामुळे, महाविकास आघाडीकडून ओमराजेंची उमेदवारी निश्चित असून महायुतीचा उमेदवार अद्याप ठरेना झालाय.
धाराशिव लोकसभा मतदारसंघातील जागेसाठी महायुतीतील शिवसेना-राष्ट्रवादी आणि भाजपा हे तिन्हीही पक्ष आग्रही आहेत. त्यात, शिवसेना शिंदे गटाने माघार घेतली असून भाजपा आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू आहे. अजित पवार हे धाराशिवच्या जागेसाठी इच्छुक आहेत. कारण, महाआघाडीत आत्तापर्यंत या जागेवर राष्ट्रवादीच्या उमेदवारानेच निवडणूक लढवली आहे. त्यामध्ये, गत निवडणुकीत राणा जगजितसिंह पाटील हे पराभूत झाले होते. मात्र, त्यापूर्वीच्या निवडणुकीत डॉ. पद्मसिंह पाटील हे राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडून आले होते. आता, महाविकास आघाडीकडून या जागेवर ओमराजे निंबाळकर यांचं नाव निश्चित झालं असून त्यांनी प्रचाराला सुरुवातही केली आहे. मात्र, महायुतीचा उमेदवार अद्याप ठरताना दिसत नाही.
महायुतीकडून येथील जागेसाठी माजी सनदी अधिकारी प्रविणसिंह परदेशी यांच्या नावाची चर्चा आहे. तर, राष्ट्रवादीकडून सुरेश बिराजदार यांनाही अजित पवारांनी कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. त्यासोबतच, कधी राणा जगजितसिंह पाटील यांच्या कुटुंबातील सदस्यांचेही नाव समोर येत आहे. त्यातच, आता महादेव जानकर यांनी महायुतीत प्रवेश केल्यामुळे त्यांना बारामतीतून आणि सुनेत्रा पवार यांना धाराशिवमधून लोकसभेच्या मैदानात उतरवण्यात येऊ शकते, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मात्र, अद्यापही महायुतीत ही जागा नेमकं कोणत्या पक्षाला सुटणार हेही निश्चित झालेलं नाही. त्यामुळे, महायुतीचा धाराशिव मतदारसंघातील उमेदवार ठरेना, अशी परिस्थिती आहे. तर, प्रविणसिंह परदेशी हे गावदौरे करत असून फेटा बांधून तयार असल्याचं दिसून आलं.
निश्चितपणे पुढील ८ ते १० वर्षात मोठ्या प्रमाणात वाहून जाणारं पुराचं पाणी आपण या दुष्काळग्रस्त भागातील विकासासाठी वळवू शकतो, हे माझं स्वप्न आहे, असे प्रविण परदेशी यांनी म्हटले. लोकप्रतिनिधी म्हणून हे कामं करण्यासाठी आपल्याला शक्ती मिळेल. मात्र, मी निवडणूक लढवणार आहे ही चर्चा खरी होईल की नाही हे पुढील दोन ते तीन दिवसांत समजेल, असे प्रविण परदेशी यांनी म्हटलं आहे. मी कुठलाही मागणी केली नाही. मात्र, तशी सूचना आल्यास मी निश्चितपणे निवडणुकीला उभे राहिल, असे प्रविणसिंह परदेशी यांनी सांगितले. त्यामुळे, महायुतीमधील धाराशिवच्या उमेदवाराच्या नावासाठी आणखी २-३ दिवस वाट पाहावी लागणार आहे.
दरम्यान, भाजपाने राज्यातील २३ लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा केली आहे. मात्र, संभाजीनगर, धाराशिव, सातारा आणि कोल्हापूर या महत्वाच्या जागांवर उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली नाही. त्यामुळे, या मतदारसंघात कोण, असा प्रश्न महाराष्ट्रातील जनतेला पडला आहे.