पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना आला वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:24 AM2021-05-28T04:24:19+5:302021-05-28T04:24:19+5:30
येणेगूर : गेल्या आठवडाभरात अवकाळी पावसाच्या सरीमुळे शेतकऱ्यांना खरीप पेरणीपू्र्व मशागत करण्यास विलंब झाला. परंतु, दोन दिवसांच्या उघडीपनंतर येणेगूर, ...
येणेगूर : गेल्या आठवडाभरात अवकाळी पावसाच्या सरीमुळे शेतकऱ्यांना खरीप पेरणीपू्र्व मशागत करण्यास विलंब झाला. परंतु, दोन दिवसांच्या उघडीपनंतर येणेगूर, महालिंगरायवाडी व दावलमलिकवाडी येथील शेतकऱ्यांनी आंतरमशागतीची कामे वेगाने हाती घेतली आहेत. ज्या शेतकऱ्यांकडे बैलजोडी आहे ते पहाटेपासून कुळव जूंपून पाळ्या घालताना दिसून येत आहेत, तर ज्या शेतकऱ्यांकडे बैलजोडी नाही ते खासगी ट्रॅक्टरवाल्यांकडून भाड्याने मशागत करवून घेत आहेत.
सध्या डिझेल दर वाढल्याने ट्रॅक्टर चालकांनीदेखील नांगरणी, कुळवणी आदीचे दर दीडपटीने वाढविले आहेत. यामुळे सामान्य शेतकऱ्यांच्या खिशाला कात्री लागत आहे. सध्या ट्रॅक्टरद्वारे नांगरणीसाठी १५०० तर कुळवणीसाठी ८०० रुपये एकरी दर आकारला जात आहे. येणेगूर शिवारात १ हजार ६०० हेक्टर क्षेत्र पेरणी योग्य असून, महालिंगरायवाडी व दावलमलिकवाडी या दोन गावात ७०० हेक्टर जमीन पेरणीयोग्य आहे. गतवर्षी ऐन सोयाबीन व उडीद, मूग काढणीवेळेस अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्यात विमा कंपनीच्या आठमुठ्या धोरणामुळे व शासनाच्या उदासीनतेमुळे अनेक शेतकऱ्यांना विम्यापासून वंचित राहावे लागले.
दरम्यान, यावर्षी येणेगूर शिवारात १ हजार २०० हेक्टर व महालिंगरायवाडी, दावलमलिकवाडी शिवारात ६०० हेक्टर क्षेत्रात सोयाबीनची पेरणी अपेक्षित असल्याचे कृषी सहायक नितीन चेंडकाळे यांनी सांगितले. उर्वरित क्षेत्रावर उडीद, मूग, तूर, बाजरी आदींची पेरणी होईल, असेही ते म्हणाले.