पाणी टंचाईने उस्मानाबाद जिल्ह्यातील ७० टक्के आरोग्य केंद्रात प्रसूती ठप्प होण्याच्या मार्गावर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2019 08:28 PM2019-03-01T20:28:27+5:302019-03-01T20:32:45+5:30
जिल्हा परिषदेतील पदाधिकाऱ्यांना मात्र, या गंभीर समस्येकडे लक्ष देण्यास वेळ नाही
उस्मानाबाद : ग्रामीण भागातील रूग्णांना वेळेवर आणि नाममात्र दरात आरोग्यसेवा मिळावी, यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आरोग्य केंद्र चालविली जातात. सदरील केंद्रांना डॉक्टरांच्या प्रश्नांसोबतच आता पाणीटंचाईचे चटकेही बसू लागले आहेत. तब्बल ७० टक्के केंद्रात सध्या पाण्याचा ठणठणाट निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रसूतींसोबतच कुटुंबकल्याण शस्त्रक्रियाही ठप्प होण्याच्या मार्गावर आहेत. असे असतानाही जिल्हा परिषदेतील पदाधिकाऱ्यांना मात्र, या गंभीर समस्येकडे लक्ष देण्यास वेळ नाही, हे विशेष.
दुष्काळी परिस्थितीमुळे खरीप तसेच रबी हंगामही हाती लागलेला नाही. त्यामुळे शेतकरी, शेतमजुरांसह अन्य नागरिकांचे अर्थकारण पूर्णत: कोलमडून पडले आहे. अशा परिस्थित खाजगी दवाखान्या उपचार घेणे ग्रामीण रूग्णांच्या अवाक्याबाहेर गेले आहे. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे सर्वसामान्य रूग्णांचा ओढा वाढला आहे. योसाबतच प्रसूती तसेच कुटुंबकल्याण शस्त्रक्रियांचे प्रमाणही जानेवारीपर्यंत उत्तम होते. जानेवारीअखेर २ हजार ९६३ कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया तजर ३ हजार २६९ प्रसूती झाल्या आहेत. दरम्यान, जानेवारीनंतर टंचाईची तीव्रता झपाट्याने वाढू लागली आहे. त्यामुळे विहीर, बोअरसारखे जलस्त्रोत झपाट्याने कोरडे पडत आहे. याचा फटका आता प्राथमिक आरोग्य केंद्रांना बसू लागला आहे.
आजघडीला जिल्हाभरातील ४२ पैैकी ७० टक्क्यांवर आरोग्य केंद्रात पाण्याचा ठणठणाट निर्माण झाला आहे. याचा थेट परिणाम कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया तसेच प्रसूतींच्या संख्येवर होऊ लागाला आहे. आरोग्य केंद्रात वास्तव्यास असलेल्या कर्मचाऱ्यांनाही पाण्यासाठी भकंती करावी लागत आहे. सध्या भूम, परंडा, वाशी, कळंबसह उस्मानाबाद तालुक्यातील अनेक आरोग्य केंद्र पाणी समस्येने हैैराण झाले आहेत. अशा परिस्थितीत जि.प. पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे. परंतु, तुर्तास तरी तसे होताना दिसत नाही.
दरम्यान, पाच-सहा वर्षांपूर्वीही अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. प्रसूतींसह कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया ठप्प झाल्या होता. तत्कालीन आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार यांनी हा प्रश्न जिल्हा परिषद पदाधिकारी तसेच जिल्हाधिकारी यांच्यासमोर मांडला होता. प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेऊन तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी आरोग्य केंद्रांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे निर्देश दिले होते. ज्या गावात टँकर सुरू आहे, त्याच टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असे. तर जेथे टँकर सुरू नव्हते, अशा ठिकाणी पर्यायी व्यवस्था करण्यात आली होती. अशा पद्धतीने आता टँकरद्वारे आरोग्य केंद्रांना पाणीपुरवठा करण्याची गरज निर्माण झाली आहे.
तीन हजारावर शस्त्रक्रिया...
एकीकडे शासन कुटुंबकल्याण कार्यक्रमावर भर देत असतानाच दुसरीकडे आरोग्य केंद्रांमध्ये पाण्याचा ठणठणाट निर्माण झाला आहे. त्यामुळे याही शस्त्रक्रिया ठप्प होण्याच्या मार्गावर आहेत. एप्रिल २०१८ ते जानेवारी २०१९ या नऊ महिन्यांच्या कालावधीत भूम तालुक्यातील केंद्रांमध्ये ४४०, कळंब ५२८, लोहारा ५७, उमरगा ३२२, उस्मानाबाद ७२१, परंडा ३०३, तुळजापूर ३५३ आणि वाशी तालुक्यातील सर्व आरोग्य केंद्रांतर्गत मिळून २३९ शस्त्रक्रिया झाल्या आहेत. सदरील शस्त्रक्रियांसाठी पाणी मोठ्या प्रमाणात लागते. परंतु, सध्या टंचाई निर्माण झाल्याने शस्त्रक्रियांच्या संख्येवरही परिणाम होवू लागला आहे.