हजारो भाविकांच्या उपस्थितीत तुळजाभवानी मंदिरात अजाबळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2018 05:07 PM2018-10-18T17:07:13+5:302018-10-18T17:09:24+5:30
तुतारी, संबळ, हलगी, बॅन्ड व नगाराच्या निनादात व आई राजा उदो उदोच्या जयघोषात हजारो देवी भक्तांच्या उपस्थितीत तुळजाभवानी मंदिरातील प्रज्वलीत होमयज्ञावर पारंपरिक पद्धतीने आज अजाबळी हा धार्मिक विधी भक्तीमय वातावरणात पार पडला.
तुळजापूर (उस्मानाबाद ) : तुतारी, संबळ, हलगी, बॅन्ड व नगाराच्या निनादात व आई राजा उदो उदोच्या जयघोषात हजारो देवी भक्तांच्या उपस्थितीत तुळजाभवानी मंदिरातील प्रज्वलीत होमयज्ञावर पारंपरिक पद्धतीने आज अजाबळी हा धार्मिक विधी भक्तीमय वातावरणात पार पडला.
महानवमी नवरात्रातील शेवटच्या माळेनिमित्त तुळजाभवानी मंदिरात चाललेल्या नवरात्रातील विविध धार्मिक उपक्रमाची दुपारी झालेल्या घटोत्थोपणाने सांगता झाली. तत्पूर्वी रात्री दीड वाजता दैनंदिन चरणतीर्थ विधी पार पडल्यानंतर भाविकांना देवी दर्शनासाठी सोडण्यात आले. यानंतर पहाटे पाचच्या सुमारास अभिषेक घाट होऊन पंचामृत अभिषेकास प्रारंभ झाला. नऊ वाजता अभिषेक संपून महंत व भोपे पुजाऱ्यांनी तुळजाभवानीची विशेष अलंकार महापूजा मांडली.
यानंतर पंचखाद्य नैवेद्य दाखवून भोपे पुजारी आकाश पाटील व संस्थानचे अध्यक्ष राधाकृष्ण गमे यांनी श्री तुळजाभवानी ची धुपारती केली. अंगारा विधी पार पडल्यानंतर सिंदफळ येथून आणलेल्या आजबळीचे विधीवत पूजन करून सवाद्य होमयज्ञावर आणण्यात आले. या ठिकाणी महसूल कर्मचारी जीवन वाघमारे यांनी पारंपरिक पद्धतीने अजाबळीचा धार्मिक विधी पार पाडला. त्यानंतर श्री तुळजाभवानीच्या चरणी रक्त तिलक लावला. सिंह गाभाऱ्यात बसविण्यात आलेले घट भोपे पुजारी पाटील व अध्यक्ष गमे यांच्या हस्ते उठविण्यात आले.
या घटोत्थोपणानंतर सवाद्यात व संबळाच्या निनादात उपदेवता त्रिशूल व मातंगी देवी या ठिकाणची घट उठविण्यात आले. त्यानंतर गोमुखातील शिवकाशी व कल्लोळातील महादेवाचे दर्शन घेण्यात आले. या ओला अंगारा विधीनंतर जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते अजाबळीचे मानकरी गणपत लांडगे व जीवन वाघमारे यांचा फेटा बांधून भर पेहराव आहेर देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी अतिरिक्त जिल्हाधिकारी पराग सोमण, तहसीलदार योगिता कोल्हे, चारही महंत, सिद्ध शवर इंतुले, भोपी मंडळाचे अमर राजे परमेश्वर सचिन पाटील ,संजय सोनजी, दिनेश परमेश्वर, पुजारी मंडळाचे सज्जनराव साळुंखे, बिपीन शिंदे, सुधीर रोचकरी, अविनाश गंगणे, उपाध्ये मंडळाचे नागेश बुवा अंबुलगे, विशाल कोंडो, मकरंद प्रयाग, सेवेकरी दयानंद आवटी, संभाजी पलंगे, मधुकर चोपदार, गौतम पवेकर, दुर्गेश छत्रे, गोंधळी अनंत रसाळ, राजेंद्र गायकवाड यांच्यासह भाविक उपस्थित होते.