साखरेपेक्षा गूळच खातोय भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:23 AM2021-06-25T04:23:37+5:302021-06-25T04:23:37+5:30
साखर कारखानदारी बहरण्यापूर्वी गावोगावी गुऱ्हाळगृहांची घरघर कानी पडायची. यामुळेच घरोघरी गुळाचा गोडवा कायम असायचा. अगदी घरात आत्पस्वकिय आले तरी ...
साखर कारखानदारी बहरण्यापूर्वी गावोगावी गुऱ्हाळगृहांची घरघर कानी पडायची. यामुळेच घरोघरी गुळाचा गोडवा कायम असायचा. अगदी घरात आत्पस्वकिय आले तरी त्याचे स्वागत शेंगा, पापड्या अन् त्यासोबत गुळाचे खडे अशा अल्पोपाहाराने व्हायचे. एवढेच काय, चहा ते फराळाच्या पदार्थाची गोडी गूळच वाढवत असे. काळाच्या ओघात साखर कारखानादारीने उभारी घेतली. उत्पादन वाढल्याने साखरेची सहज उपलब्धता वाढली. यामुळे गूळ हा फक्त गरिबांच्या भटारखान्यातच उरला अन् हाती पैसा खुळखुळणार्याच्या घरात साखरेची ‘श्रीमंती’ दवडू लागली. एकूणच पुढील काळात पांढऱ्या शुभ्र साखरेने एकप्रकारे गोडव्याची मक्तेदारीच निर्माण केली.
मात्र, मधुमेहाचे वाढते प्रमाण, स्थूलपणा यासह विविध कारणाने साखर नकोशी झाली. यामुळेच गुळाकडे लोक पुन्हा वळले. यातच कोरोनामुळे आईसक्रीम ते स्वीटमार्टमधील पदार्थाची निर्मिती ‘लॉकडाऊन’ झाली. साखरेची एकूण मागणी कमी झाली अन् नकळत मागणीत वाढ झालेल्या गुळाने चांगलेच भाव खाव खाण्यास सुरुवात केली आहे.
ग्राफ...
▪️असा वाढला गुळाचा भाव
साल साखर गूळ
२००० २४ ४८
२००५ २९ २५
२०१० ३० २८
२०२० ३१ ३२
२०२१ ३५ ४०
साखरेचा खप होतोय; पण गुळाची मागणीही वाढली
बाजारात हॉटेल, आइस्क्रीम आदी बंद असल्याने साखरेची नियमित ग्राहकांकडून खरेदी कमी झाली आहे. याशिवाय आरोग्याच्या कारणामुळेही वापर कमी होतोय. या स्थितीत गुळाचा वापर वाढतोय. साखरेच्या दराला गुळाच्या दराने मागे टाकले आहे. भविष्यातही त्यात वृद्धी अपेक्षित आहे.
- शिवराज होणराव, अध्यक्ष, किराणा असोसिएशन, कळंब
साखरेच्या भावाला गुळाच्या भावाने ओव्हरटेक केले आहे. असे असले तरी साखर वापरणारे साखरच अन् गूळ वापरणारे गूळच वापरत आहेत. दोन्हीचे ग्राहक कायम आहेत. फक्त दराने मात्र साखरेला मागे टाकले आहे.
- संतोष शेळके, किराणा व्यापारी, कळंब
गावात मात्र साखरच
इटकूर येथील तरुण व्यावसायिक वल्लभ पोते यांनी सांगितले की, माझे किराणा दुकान ग्रामीण भागात आहे. माझ्याकडे साखरेचा खप कायम आहे. गुळाची मागणी व दर वाढत असले तरी साखरेचा घरगुती वापर कमी असल्याचे दिसून येत आहे.
गूळ हा शरीरासाठी कायम हितकारी आहे. गुळात लोहाचे अन् फुक्टोज साखेरेचे प्रमाण आहे तर साखेरत ग्लुकोज व गंधक असते. यामुळे साखरेपेक्षा गूळ चांगलाच. पचनास फायदेशीर आहे.
- डॉ. पुरुषोत्तम पाटील, वैद्यकीय अधिकारी, कळंब
गुळाचा चहा बनले स्टेटस
सध्या शहरी भागात गुळाचा चहा उपलब्ध होत आहे. याचा पेय म्हणून नियमित वापर करणारेही वाढत आहेत. असे असले तरी ग्रामीण भागात गूळ हे शक्तिवर्धक असल्यामुळे पूर्वी गूळ शेंगदाणे, गूळ पापडी, गुळाचा चहा, गुळवणी इत्यादी आम्ही घेत होतो. त्यामुळे दिवसभरामध्ये उत्साह वाढत असे व रक्तवाढीसाठी उपयुक्त असल्यामुळे तसेच शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी हे आम्ही नेहमीच घेत होतो, असे मस्सा येथील बिभीषण अनभुले यांनी सांगितले.