तुळजाभवानी मंदिरातील विधी बंद असतानाही खाजगीत बुकिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2021 05:17 PM2021-10-25T17:17:26+5:302021-10-25T17:18:37+5:30

Tulja Bhavani temple : जवळपास गेल्या दोन वर्षांपासून मंदिरात केवळ शासकीय धार्मिक विधी होत आहेत. भाविकांना पूजेची परवानगी अजूनही मिळालेली नाही.

Private booking even when rituals at Tulja Bhavani temple are closed | तुळजाभवानी मंदिरातील विधी बंद असतानाही खाजगीत बुकिंग

तुळजाभवानी मंदिरातील विधी बंद असतानाही खाजगीत बुकिंग

googlenewsNext
ठळक मुद्देपाच वेबसाइट प्रशासनाच्या रडारवर

उस्मानाबाद : श्री तुळजाभवानी देवीच्या (Tulja Bhavani temple)  नावाने वेबसाइट सुरू करून त्यावरून अभिषेक व विविध पूजांचे बुकिंग घेत असल्याचा आक्षेपार्ह प्रकार उघडकीस आला आहे. यानंतर मंदिर प्रशासनाने पोलिसांच्या आयटी सेलच्या माध्यमातून अशा साइट्स रडारवर घेतल्या असून, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

श्री तुळजाभवानी देवीच्या नावाने वेबसाइट्स उघडून त्यावर मंदिराशी संबंधित पूजा, दर्शन याबाबतची माहिती देण्यात आली आहे. शिवाय, याच साइटवरून मंदिरातील अभिषेक पूजा, सिंहासन पूजा व इतर विधींबाबत बुकिंग घेण्यात येत असल्याचे उघडकीस आले आहे. यासंदर्भात बाळासाहेब सुभेदार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तक्रार केली होती. या तक्रारीनंतर मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी या प्रकाराच्या तळाशी जाण्याचा प्रयत्न केला असता अशी एखाद-दुसरी नाही, तर तब्बल ५ वेबसाइट्स आढळून आल्या आहेत. याबाबतची माहिती मंदिर प्रशासनाकडून पोलिसांच्या आयटी सेलकडे देण्यात आली आहे.

भाविकांना पूजेची परवानगी अजूनही मिळालेली नाही
पोलीस अधीक्षक नीवा जैन व अपर अधीक्षक नवनीत कांवत यांनी तांत्रिक विश्लेषणाच्या सूचना केल्यानंतर या साइटवरून बुकिंग घेतले जात असल्याचे समोर आले. दरम्यान, जवळपास गेल्या दोन वर्षांपासून मंदिरात केवळ शासकीय धार्मिक विधी होत आहेत. भाविकांना पूजेची परवानगी अजूनही मिळालेली नाही. असे असतानाही या साइट्सवरून बुकिंग घेऊन भाविकांची लूट केली जात असल्याचे सकृतदर्शनी निदर्शनास येत आहे. याअनुषंगाने या साइटधारकांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

कायदेशीर कार्यवाही केली जाणार
मंदिरात अद्याप भाविकांना कोणतेही विधी करण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. प्रशासनाने शोध घेतला असता ५ साइट्सवरून पूजा-विधींचे बुकिंग होत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे पोलिसांच्या आयटी विभागाकडे हे प्रकरण सोपवण्यात आले आहे. त्यांच्याकडून विविध तांत्रिक विश्लेषणे केली जात आहेत. त्यातून भाविकांची लूट होत असल्याचे निष्पन्न झाल्यास कायदेशीर कार्यवाही केली जाणार आहे.
- कौस्तुभ दिवेगावकर, अध्यक्ष मंदिर संस्थान तथा जिल्हाधिकारी
 

Web Title: Private booking even when rituals at Tulja Bhavani temple are closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.