अंतर्गत रस्ते, नाल्यांचा प्रश्न सुटेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:38 AM2021-02-17T04:38:22+5:302021-02-17T04:38:22+5:30
सुविधांचा आढावा प्रभाग : १ बालाजी बिराजदार लोहारा : शहरातील प्रभाग क्रमांक-१ मध्ये काही भागांत अंतर्गत रस्ते, नाल्यांची कामे ...
सुविधांचा आढावा
प्रभाग : १
बालाजी बिराजदार
लोहारा : शहरातील प्रभाग क्रमांक-१ मध्ये काही भागांत अंतर्गत रस्ते, नाल्यांची कामे झाली असली तरी अनेक ठिकाणी अजूनही अंतर्गत रस्ते, नाल्यांचा प्रश्न सुटलेला नाही. शिवाय, अनेक ठिकाणी विजेच्या खांबावर बसविलेल्या बल्बपैकी काही बंद तर काही चालू आहेत. यामुळे काही ठिकाणी नेहमीच अंधाराचे साम्राज्य दिसून येते.
लोहारा शहर हे तालुक्याचे ठिकाण असल्याने शासनाने तालुकास्तरावरील ग्रामपंचायतीला नगरपंचायतचा दर्जा दिला. त्यात लोहारा शहराचाही सामावेश झाला. यानंतर नगरपंचायतची पहिली निवडणूक राजकीय पक्षाच्या चिन्हावर झाली. त्यात शिवसेनेला बहुमत मिळाले असले तरी सत्ता मात्र शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसने उपभोगली आहे. यामुळे विकासकामे आपण करू शकलो नाही, असे कुणालाच म्हणता येणार नाही. प्रभाग क्रमांक-१ हा बसस्थानकासमोरील भाग. त्यात जेवळीकर, महाजन प्लॉटिंग, इंदिरानगरचा काही भाग येतो. या प्रभागात इंदिरानगर व समोरील भागात सिमेंट रस्ते, नाल्यांची कामे नगरपंचायतीकडून करण्यात आली. परंतु जेवळीकर प्लॉटिंगमध्ये काही रस्ते कच्चे असून, याच भागात अंतर्गत रस्ते व नाल्यांचा प्रश्न आजही कायम आहे. यामुळे रहिवाशांची मोठी गैरसोय होताना दिसते.
कोट......
प्रभाग क्रमांक-१मध्ये निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रभागात रस्ते, पाणी, वीज याची व्यवस्था करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार निवडून येताच दोन दिवसांत प्रभागामध्ये स्वखर्चाने बोअर पाडून १०० घरांमध्ये पाइपलाइन करून पाण्याची व्यवस्था केली. मागील १५ ते २० वर्षांपासून या भगाात विजेची समस्या होती. तिही स्वखर्चाने पोल व तारा ओढून दूर केली. तसेच सिमेंट रस्ते केले. या भागातील केवळ २० टक्के रस्त्यांची कामे तांत्रिक अडचणीमुळे होऊ शकलेली नाही. तिही लवकरच पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे.
- आरती सतीश गिरी, नगरसेविका
प्रभाग क्र.-१ हा भाग लोहारा शहराचे प्रवेशद्वार आहे. या प्रभागामध्ये वीज, रस्ते, पाणी हे मूलभूत प्रश्न अजूनही कायम आहे. नगरपंचायत प्रशासन व लोकप्रतिनिधींकडून या प्रभागाचा सर्वांगीण विकास अद्यापही होऊ शकलेला नाही, ही वस्तुस्थिती आहे.
- सारिका प्रमोद बंगले, नागरिक
प्रभाग-१ मध्ये कानेगाव रस्त्यालगत असलेल्या घरासमोर पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी थांबते. यासंदर्भात वारंवार नगरपंचायत प्रशासन संबंधित नगरसेवकांना कल्पना दिली. परंतु, हा प्रश्न सोडविण्यासाठी अद्याप कुणीही पुढाकार घेतला नाही. यामुळे पावसाळ्यात रहिवाशांची गैरसोय होते.
- इस्माईल मुल्ला, प्रभाग नागरिक
फोटो - प्रभाग-१ मधील मोमिन कापड दुकान ते फरीदाबादकर यांचे घर.