अंतरवली लाठीचार्जचा निषेध; कळंबमध्ये संभाजी ब्रिगेडचे ठिय्या मारत 'बोंबा मारो' आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2023 09:13 PM2023-09-01T21:13:53+5:302023-09-01T21:14:20+5:30
मराठा आरक्षण आंदोलन मोडू पाहणाऱ्या सरकारचा धिक्कार असो अशा घोषणा दिल्या.
कळंब: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर अंतरवली ता. अंबड जि. जालना येथे सुरू असलेल्या आंदोलना दरम्यान पोलिसांनी केलेल्या लाठीचार्ज करत अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्याच्या निषेधार्थ कळंब येथे शुक्रवारी रात्री सव्वाआठ वाजता रस्त्यावर ठिय्या मारत संभाजी ब्रिगेडने 'बोंबा मारो' आंदोलन केले.
जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटा येथे मराठा समाजाला आरक्षण द्यावे या मागणीसाठी आंदोलन सुरू होते. या दरम्यान, बळाचा वापर करत पोलीसांनी लाठीचार्ज, अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्याचा निषेध करण्यासाठी कळंब येथे संभाजी ब्रिगेडचे काही कार्यकर्ते रात्री आठ वाजता कळंब येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकवटले.यावेळी त्यांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच बोंबा मारत आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करणार्या शासनाचा निषेध सुरू केला.
यानंतर रस्त्यावर ठिय्या मारत मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे. मराठा आरक्षण आंदोलन मोडू पाहणाऱ्या सरकारचा धिक्कार असो अशा घोषणा दिल्या. या आंदोलनात संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक अतुल गायकवाड, जिल्हाध्यक्ष अॅड तानाजी चौधरी, विश्वजीत जाधव, विलास गुंठाळ आदी पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते