नवीन ३३ केव्हीए उपकेंद्राचा प्रस्ताव धूळखात पडून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:38 AM2021-09-04T04:38:51+5:302021-09-04T04:38:51+5:30
पाथरूड (जि. उस्मानाबाद) : भूम तालुक्यातील पाथरूडसह परिसरातील जवळपास १६ गावांना सुरळीत वीजपुरवठा व्हावा, यासाठी नळीवडगाव फाटा येथे नवीन ...
पाथरूड (जि. उस्मानाबाद) : भूम तालुक्यातील पाथरूडसह परिसरातील जवळपास १६ गावांना सुरळीत वीजपुरवठा व्हावा, यासाठी नळीवडगाव फाटा येथे नवीन ३३ केव्हीए केद्राचा प्रस्ताव शासनाकडून यापूर्वीच पाठविण्यात आला आहे. परंतु, अद्याप या प्रस्तावास मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे सुरळीत वीजपुरवठ्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून, ग्राहकांतून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
पाथरूड येथे ३३ केव्हीए उपकेंद्र आहे. या उपकेंद्रावर दिवसागणिक ताण वाढत आहे. परिणामी विहीर, बाेअर तसेच प्रकल्पांमध्ये पाणी असूनही पिकांना देता येत नाही. पाण्याअभावी पिके करपून जातात. ही बाब लक्षात घेऊन नळीवडगाव फाटा येथे नवीन ३३ केव्हीए उपकेंद्राचा प्रस्ताव तयार करून ताे सरकारकडे पाठविण्यात आला आहे. परंतु, आजवर त्या प्रस्तावास मान्यता देण्यात आलेली नाही. त्यामुळे खंडित वीजपुरवठ्याचा प्रश्न जैसे थे आहे. दरम्यान, या प्रश्नावरून पाथरूडसह १६ गावांतील शेतकरी, वीजग्राहक प्रचंड संतप्त झाले आहेत. नवीन ३३ केव्हीए उपकेंद्र उभारून प्रश्न तातडीने मार्गी लावावा, अशी मागणी नळीवडगाव - घुलेवाडी-गिरलगाव ग्रुप ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच प्रियंका प्रवीण रणबागुल यांनी केली आहे. मागणीचे निवेदन महावितरणच्या भूम कार्यालयास देण्यात आले आहे. निवेदनाची एक प्रत जिल्हाधिकारी कार्यालयासही देण्यात आली आहे.