विविध योजनांचे प्रस्ताव रखडले; आंदोलकांनी पंचायत समितीला टाळे ठोकून मांडला ठिय्या
By गणेश कुलकर्णी | Published: May 4, 2023 03:29 PM2023-05-04T15:29:32+5:302023-05-04T15:33:39+5:30
प्रस्तावांना मंजुरी मिळत नसल्याचा आरोप
धाराशिव : विविध योजनांच्या रखडलेल्या प्रस्तावास मंजुरी मिळत नसल्याचा आरोप करीत स्वराज्य संघटनेच्या वतीने गुरुवारी जिल्ह्यातील लोहारा येथील पंचायत समिती कार्यालयास टाळे ठोकून ठिय्या आंदोलन करण्यात आले.
लोहारा पंचायत समिती कार्यालयात विविध योजनांचे प्रस्ताव गेल्या अनेक दिवसापासून रखडले असून, या प्रस्तावावर त्वरित कारवाई करावी, अशी मागणी स्वराज्य संघटनेने यापूर्वीच निवेदनाद्वारे केली होती. परंतु, प्रशासनाकडून यावर कुठलीच कार्यवाही होत नसल्यामुळे अखेर गुरुवारी पंचायत समिती कार्यालयास टाळे ठोकून ठिय्या आंदोलन करावे लागले, असे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी शितल खिंडे यांनी लवकरात लवकर फळबाग लागवड तसेच शेवगा लागवडी व सिंचन विहिरीचे प्रस्ताव मंजूर करण्यात येईल, असे अश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रशांत थोरात सामाजिक कार्यकर्ते महेश गोरे, तानाजी पाटील, बळी गोरे, बापू साळुंखे, ओमकार चौगुले, ऋषिकेश पाटील, फकीरा ब्रिगेडचे श्रीरंग सरवदे, दीपक निकाळजे, अमित सुरवसे ,परमेश्वर जाधव, मुकेश गोरे, बळीराम धारुळे, दिपक खंडाळे, हनुमंत गवळी, रोहित जाधव, निकेश बचाटे, सतीष बनकर, निळू गवसनी, वैभव पवार आदी उपस्थित होते.