धाराशिवमध्ये खाजगीकरणाविरोधात शिक्षकांचा आक्रोश मोर्चा
By सूरज पाचपिंडे | Published: October 2, 2023 05:57 PM2023-10-02T17:57:52+5:302023-10-02T17:58:05+5:30
धाराशिव जिल्हा कचेरी परिसर घोषणांनी दणाणला
धाराशिव : शिक्षणाचे खाजगीकरण थांबविण्यात यावे, तसेच शिक्षकांना अशैक्षणिक कामे देऊ नयेत, या प्रमुख मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने सोमवारी जिल्हाकचेरीवर आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी शिक्षकांनी शासनाच्या धोरणाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
शासनाकडून शिक्षकांना शिक्षणाव्यतिरिक्त अन्यच कामे दिली जात आहेत. शिकविण्याऐवजी दुसऱ्याच कामात व्यस्त राहत असल्यामुळे गोरगरीबांच्या मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे शासनाच्या अशा धोरणाचा विरोध दर्शविण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक संघाच्या वतीने सोमवारी जिल्हाकचेरीवर आक्रोश मोर्चा काढण्यात आला.
विंचू चावला विंचू चावला खाजगीकरणांचा विंचू चावला, आता नको टेन्शन, सुरु करा पेन्शन, सरकारी शाळा टिकल्याचं पाहिजेत, गोरगरीबांची लेकरं शिक्षकलीच पाहिजे, बंद करा बंद करा खाजगीकरण बंद करा, आम्हाला शिकवू द्या, अशा घोषणांनी जिल्हाकचेरीपरिसर दणाणून गेला होता. जिल्ह्यातील हजाेरोच्या संख्येने शिक्षक काळ्या फिती लावून मोर्चात सहभागी झाले होते.