२१ गावात जनता कर्फ्यू लागू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:25 AM2021-06-04T04:25:25+5:302021-06-04T04:25:25+5:30
लोहारा : तालुक्यातील २१ गावात कोरोनचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले यांनी या गावात १२ जूनपर्यत ...
लोहारा : तालुक्यातील २१ गावात कोरोनचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले यांनी या गावात १२ जूनपर्यत जनता कर्फ्यू लागू करण्याचे आदेश दिले आहेत.
लोहारा शहरासह तालुक्यात मागील तीन महिन्यापासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. तालुक्यात आतापर्यत तीन हजारच्या पुढे रग्ण आढळून आले असून, यातील ६२ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच आजही ४०० वर रुग्ण ॲक्टिव्ह आहेत. याच पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना करून निर्बंध लावण्यात आले होते. परिणामी काही प्रमाणात रुग्ण संख्या आटोक्यात आली होती. परंतु, पुन्हा कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. त्यात कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी तातडीने नियंत्रण करणे, प्रतिबंधात्मक उपाययोजना आखणे आवश्यक आहे. याच अनुषंगाने उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले यांनी तालुक्यातील २१ गावांमध्ये जनता कर्फ्यू लागू करण्याचे आदेश दिले आहेत.
आपत्कालीन परिस्थिती नियंत्रणात राहावी यासाठी हे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार २ ते १२ जून रोजी सकाळी ७ पर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ नुसार मनाई हुकूम आदेश लागू केला आहे. या आदेशाप्रमाणे २१ गावातील सर्व दुकाने पुढील आदेशांपर्यंत बंद राहतील. तथापि रुग्णालय व त्यांच्याशी संलग्न मेडिकल चालू राहतील. तसेच या गावातील नागरिकांना संबंधित ग्रामपंचायतीने नेमून दिलेल्या ठराविक वेळेत अत्यावश्यक सेवा पुरविण्याची मुभा राहील. सदरील अत्यावश्यक सेवा पुरवताना फिजिकल डिस्टनसिंग व आरोग्य विषयक नियमांचे पालन करावे, असे या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
चौकट..........
या गावांमध्ये जनता कर्फ्यू
उपविभागीय अधिकाऱ्यांनी जारी केलेल्या आदेशानुसार तालुक्यातील कानेगाव, नागूर, लोहारा (खुर्द), जेवळी, एकोंडी (लो), धानुरी, हिप्परगा (रवा), सास्तूर, खेड, आष्टाकासार, मार्डी, कास्ती (बु.), अचलेर, भातागळी, मोघा (बु), सालेगाव, कोंडजीगड, नागराळ, तावशीगड, वडगाव (गां), जेवळी दक्षिण या गावांमध्ये १२ जूनपर्यंत जनता कर्फ्यू राहणार आहे.