कडधान्य आयातीचा कोटा शेतकऱ्यांच्या मुळावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:31 AM2021-03-21T04:31:11+5:302021-03-21T04:31:11+5:30

उस्मानाबाद : केंद्र सरकारने उडीदासोबतच आता तूर व मूग आयातीचा कोटा जाहीर केला आहे. यातून बड्या आयातदारांचा फायदा होणार ...

Pulses import quota on farmers' roots | कडधान्य आयातीचा कोटा शेतकऱ्यांच्या मुळावर

कडधान्य आयातीचा कोटा शेतकऱ्यांच्या मुळावर

googlenewsNext

उस्मानाबाद : केंद्र सरकारने उडीदासोबतच आता तूर व मूग आयातीचा कोटा जाहीर केला आहे. यातून बड्या आयातदारांचा फायदा होणार असून, यामुळे देशांतर्गत शेतमालाचे भाव घसरणीस लागल्याने हे धोरण शेतकऱ्यांच्या मुळावर उठल्याचा दावा करीत किसान काँग्रेसने विरोध केला आहे.

केंद्र सरकारने आगामी वर्षासाठी तूर ४ लाख टन तर मूगासाठी दीड लाख टन आयात करण्याचा कोटा जाहीर केला आहे. यातून डाळ मिल उद्योजक आणि आयातदारांच्या बड्या कंपन्यांनाच फायदा होईल.

दुसरीकडे आता कोठे तुरीला बाजारात चांगला भाव मिळू लागला होता. मूग आणि उडीदही तेजीत होता. मात्र, या आयात धोरणामुळे दर घसरणीस लागल्याचा दावा किसान काँग्रेसचे मराठवाडा उपाध्यक्ष हनुमंत पवार यांनी केला आहे. सोबतच यावर्षीच्या अर्थसंकल्पात केंद्र सरकारकडून डाळींच्या खरेदीवर खर्च होणाऱ्या रकमेमध्ये निम्म्यापेक्षा जास्त घट केली गेली आहे. याचा फटका डाळ पिकांच्या हमीभाव खरेदीवर होणार आहे. मागील वर्षी केंद्र सरकारने डाळींच्या खरेदीसाठी ८०० कोटी रुपयांची तरतूद केली होती. यावर्षी त्यात घट करून ३०० कोटींची तरतूद केल्याचेही पवार म्हणाले.

मराठवाडा आणि विदर्भात तूर आणि हरभरा पिकाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते. कोरडवाहू शेतकऱ्यांना हक्काचे चार पैसे या उत्पादनांतून मिळण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, या निर्णयाने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला जाणार असल्याचा आरोप करीत या निर्णयाचा निषेधही किसान काँग्रेसच्यावतीने करण्यात येत असल्याचे हनुमंत पवार यांनी कळविले आहे.

Web Title: Pulses import quota on farmers' roots

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.