अतिवृष्टीमुळे बाधित पिकांचे पंचनामे करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:39 AM2021-09-09T04:39:42+5:302021-09-09T04:39:42+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क परंडा : तालुक्यात ४ सप्टेंबरपासून सलग तीन ते चार दिवसात पाचही मंडलांमध्ये अतिवृष्टी झाल्याने नदी, ...
लोकमत न्यूज नेटवर्क
परंडा : तालुक्यात ४ सप्टेंबरपासून सलग तीन ते चार दिवसात पाचही मंडलांमध्ये अतिवृष्टी झाल्याने नदी, नाले, ओढ्यांना पूर आला. तालुक्यातील खासापुरी, चांदणी प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले असून, पावसाने जोरदार बॅटिंग केल्याने शेती, फळबागा, पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या अनुषंगाने बुधवारी तहसीलदार वीर वाबळे यांनी तातडीची बैठक घेऊन अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या पिकांचे पंचनामे करून सात दिवसांच्या आत नुकसानाचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.
मध्यंतरी हात आखडून बसलेल्या पावसाला ४ सप्टेंबरपासून सुरुवात झाली. गेल्या तीन ते चार दिवसांमध्ये तालुक्याच्या परंडा, आसू, जवळा, आनाळा, सोनारी या पाचही मंडलांमध्ये अतिवृष्टी झाल्याने शेतात पाणी साचून उभ्या पिकांचे नुकसान झाले. कापसाच्या कैऱ्यात पाणी जाऊन हातातोंडाशी आलेले पीक वाया गेले. मुगाच्या शेंगा झडल्या, मोसंबीला गळ लागली, उभी असलेली तूर, ऊस शेतातच आडवे झाले. डाळिंब गळून पडले तर काढलेले उडीद पीक पावसात भिजल्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. तालुक्यातील लागवडीखालील क्षेत्रापैकी जवळपास ६५ टक्के पिकांचे नुकसान झाले असून, पेरणीसाठी केलेला खर्चसुद्धा शेतकऱ्यांच्या पदरात पडणार नाही, अशी परिस्थिती आहे. राज्य शासनाने अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत.
दरम्यान, तालुक्यातील बाधित पिकांचे पंचनामे करण्याच्या दृष्टिकोनातून तहसीलदार वीर वाबळे यांनी बुधवारी तहसील कार्यालयातील सभागृहात बैठक घेतली. यावेळी त्यांनी सर्व ग्रामसेवक व तलाठी यांना ई-पीक पाहणी करून, जिओ टॅग फोटोच्या माध्यमातून तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले. या बैठकीला तालुका कृषी अधिकारी महारुद्र मोरे यांच्यासह मंडल अधिकारी, कृषी सहाय्यक, ग्रामसेवक, तलाठी उपस्थित होते.
080921\psx_20210908_150430.jpg
पावसाने जोरदार बॅटिंग केल्याने शेती फळबागा पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. बुधवारी तहसीलदार वीर वाबळे यांनी तातडीची बैठक घेतली.