मोमीन गल्लीतील रस्त्याचा प्रश्न रखडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2021 04:21 AM2021-02-19T04:21:48+5:302021-02-19T04:21:48+5:30
प्रभाग क्रमांक ३ बालाजी बिराजदार लोहारा : लोहारा शहरातील प्रभाग क्रमाक तीनमधील भाग हा जुने गावात येत असून यातील ...
प्रभाग क्रमांक ३
बालाजी बिराजदार
लोहारा : लोहारा शहरातील प्रभाग क्रमाक तीनमधील भाग हा जुने गावात येत असून यातील रस्ते, गटारीची कामे झाली असली तरी मोमीन गल्लीतील रस्ता व गटारीचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. यामुळे या भागातील रहिवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
शहरातील प्रभाग क्रमांक तीनमध्ये जुनी नगरपंचायत, हनुमान मंदिर, मोमीन मशीद, भीमनगर, महादेव मंदिर हा भाग येतो. १९९३ साली झालेल्या प्रलंयकारी भूकंपानंतर शहराचे पुनर्वसन न होता पुनर्बांधणी झाली. त्यामुळे शासनाने नागरिकांना जागा दाखवेल त्या ठिकाणी घरे बांधून दिली. त्यात या प्रभागातील बहुतांश नागरिकांनी पूर्वीच्याच ठिकाणी राहणे पसंत केले. येथे ग्रामपंचायत असताना या भागातील रस्ते, गटारी, विजेचा प्रश्न सुटलेला नव्हता. त्यानंतर लोहारा शहर हे तालुक्याचे ठिकाण असल्याने ग्रामपंचायतला शासनाने नगरपंचायतचा दर्जा दिला. त्यामुळे आता तरी विकासाची कामे मार्गी लागतील, अशी आशा नागरिकांना होती. त्यात याच प्रभागाच्या नगरसेविका पौर्णिमा लांडगे यांच्या रूपाने या प्रभागाला प्रथम अडीच वर्षे नगराध्यक्षपद मिळाले. या काळात बसवेश्वर मंदिर ते जुनी वेस या दरम्यानच्या रस्त्याचे डांबरीकरण व एकाची नाली गटार, मागासवर्गीय वस्तीत सिमेंट रस्ता तसेच आ. ज्ञानराज चौगुले यांच्या आमदार निधीतून बोअर घेण्यात आली. रशिद शेख ते विरोधे घरापर्यत कच्चा रस्ता, चाटे गल्ली एका बाजूची नाली ही कामेही पूर्ण झाली. परंतु, डांबरीकरण झालेल्या रस्त्यावर अजून कारपेटचे काम बाकी आहे. शिवाय, पूर्वी केलेले काम काही ठिकाणी उखडले आहे. यामुळे कामाच्या गुणवत्तेसंदर्भात नागरिकांतून प्रश्न उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, मागील अनेक वर्षांपासून मोमिन गल्ली व चाटे गल्लीच्या रस्त्याचा प्रश्न बिकट बनला आहे. पावसाळ्यात तर मोमीन गल्लीत पावसाचे व गटारीचे पाणी एकत्रच वाहत असल्याने नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत असून, यामुळे नागरिकांच्या आरोग्याला याचा धोका नाकारता येत नाही. त्यामुळे नगर पंचायतीने हा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी होत आहे.
कोट........
प्रभाग क्रमांक तीनमध्ये अनेक विकासकामे झाली असली तरी डांबरीकरण रस्त्यावर अजून कारपेटचे काम बाकी आहे. शिवाय, पूर्वी केलेले काम काही ठिकाणी उखडले आहे. घरासमोर नालीचे काम झाले. परंतु, स्वच्छता नसल्याने दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे रखडलेली कामे तत्काळ मार्गी लावण्याची गरज आहे.
- नरेश माळवदकर, रहिवासी
कोट........
आमच्या प्रभाग क्रमांक तीनला सुरुवातीची अडीच वर्षे नगराध्यक्षपद मिळाले. त्यामुळे काही प्रमाणात विकासकामे झाली असली तरी मोमिन गल्ली व चाटे गल्लीच्या रस्त्याचा प्रश्न अजूनही बिकटच आहे. तेथील डांबरीकरणाचे कारपेटचे काम गेल्या अनेक दिवसांपासून रखडले आहे.
- ज्योती स्वामी, रहिवासी
कोट........
प्रभाग क्रमांक ३ मध्ये बसवेश्वर मंदिर ते जुनी वेस एक बाजू नाली व डांबरीकरण रस्ता, मागासवर्गीय वस्तीत सिमेंट रस्ता, आ. ज्ञानराज चौगुले यांच्या आमदार निधीतून बोअर घेतली. रशिद शेख ते विरोधे घरापर्यंत कच्चा रस्ता, चाटे गल्ली एका बाजूची नाली यासह मोमीन गल्लीतील रस्त्याचे कामदेखील मंजूर असून, लवकरच ते सुरू होईल.
- पौर्णिमा लांडगे, नगरसेविका
फोटो - लोहारा शहरातील प्रभाग क्रमांक ३ मधील मोमीन गल्लीतील रस्त्याची अशी दुरवस्था झाली आहे.