पळसगाव तांड्यावरील तीन दारूअड्डयावर छापा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 04:23 AM2020-12-27T04:23:50+5:302020-12-27T04:23:50+5:30
लाखाचा मुद्देमाल जप्त - १७ जणांविरूद्ध गुन्हा दाखल उमरगा: तालुक्यातील पळसगाव तांडा येथील साठवण तलावा लगत असलेल्या गावठी दारूच्या ...
लाखाचा मुद्देमाल जप्त - १७ जणांविरूद्ध गुन्हा दाखल
उमरगा: तालुक्यातील पळसगाव तांडा येथील साठवण तलावा लगत असलेल्या गावठी दारूच्या तीन अड्डयांवर उपविभागीय पोलिस अधिकारी व पोलीस निरीक्षक यांच्या संयुक्त पथकाने बुधवारी पहाटे गोपनीय माहितीनुसार छापा टाकून गावठी दारूचे अवैध अड्डे उध्वस्त केले. या छाप्यात सुमारे १ लाख ७ हजार २०० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी १७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पळसगाव तांडा येथील साठवण तलावालगत तीन ठिकाणी गावठी दारूअड्डे सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक मुकुंद आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी पहाटे पोलीस उपनिरीक्षक अमोल मालुसरे, बीट अंमलदार विष्णु मुंडे, सलिम शेख, पोलीसकर्मचारी प्रताप बांगर,वाघुलकर, नाना पाटोळे, घुले, घोडके, शिंदे, फडतरे, कुलकर्णी, महिला कर्मचारी चव्हाण, शिंदे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांचा फौजफाटा पळसगाव तांडा येथे दाखल झाला. साठवण तलावालगत जमिनीत पुरून व उघड्यावर गुळ मिश्रत रसायनासह गावठी हातभट्टी दारूच्या तीन अड्डयांवर छापा टाकला. यावेळी तीन ठिकाणच्या छाप्यात २०० लिटर क्षमतेचे १९ बॅरेल व जमिनीत पुरून ठेवलेल्या १३ रांजणमध्ये २ हजार ६८० लिटर गुळ मिश्रित रसायन जप्त केले. ज्याची किंमत १ लाख ७ हजार २०० एवढी आहे. या प्रकरणी नीलकंठ राठोड, मोहन चव्हाण, अविनाश जाधव (सर्व रा पळसगाव तांडा), शिवाजी राठोड, वसंत राठोड ( दोघे रा. सेवानगर तांडा). मधुकर राठोड, अंबु राठोड, राजू राठोड, अबु राठोड (सर्व रा पळसगावतांडा). मनोज पवार, माणिक चव्हाण, विनोद पवार, संजु राठोड, विठ्ठल जाधव (सर्व रा पळसगावतांडा), बिस्मिल्ला बोराटे, प्रकाश मलंग (दोघे रा खसगी) तीन गावठी दारू अड्डयावरील सतरा जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्वजण फरार झाले आहेत.
उत्पादन शुल्क विभागाचे दुर्लक्ष...
शहर व तालुक्यातील अनेक गावात गावठी दारू व शिंदी अवैध धंदे राजरोसपणे सुरू असून याकडे होणाऱ्या दुर्लक्षामुळे अवैध धंद्याना पाठबळ मिळत आहे की काय ? असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित होत आहे.