यंदा पाऊसमान चांगले राहील; पंचांगकर्त्यांसह हवामान तज्ज्ञांचा अंदाज
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2023 04:56 PM2023-04-22T16:56:41+5:302023-04-22T16:57:29+5:30
शेतकरी हवालदिल न होता सुखात व आनंदात राहतील, असा अंदाज पंचांगकर्त्याने वर्तविला आहे.
- व्ही. एस. कुलकर्णी
उदगीर : यंदाच्या शोभन नाम संवत्सरात मेघाचा निवास रजकाचे घरी असल्यामुळे पाऊस पुष्कळ प्रमाणात होऊन धन-धान्यांची समृद्धी होईल. एकंदरित हे वर्ष चांगले असणार आहे. मात्र, सोसाट्याचा वारा सुटून संकटे उद्भवतील. धान्यांची, धनाची नासाडी होऊन घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार असल्याचा अंदाज पंचांगकर्ते व हवामान तज्ज्ञाने वर्तविला आहे.
यंदा गूळ, तूप, मध कमी प्रमाणात मिळणार आहे. तसेच मणी, मोती, सोने महाग होणार आहे. जनावरांकडून दूध, दुभते भरपूर मिळणार आहे. धार्मिक कार्यक्रम वाढत जातील. शेतकरी हवालदिल न होता सुखात व आनंदात राहतील, असा अंदाज दाते व अन्य एका पंचांगकर्त्याने वर्तविला आहे. तर अन्य तिसऱ्या एका पंचांगकर्त्याने पावसाचे मान निराशाजनक असून, काही ठिकाणी ओला तर काही ठिकाणी कोरडा दुष्काळाला तोंड द्यावे लागेल. शेती व पिकाविषयीचे अंदाज चुकतील. जीवनावश्यक वस्तूंची टंचाई जाणवेल व रोगराईचे प्रमाण वाढेल, असा अंदाज वर्तविला आहे.
एप्रिलच्या मध्यापासून उष्णतामानात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. मेच्या मध्यभागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. मान्सूनच्या पावसाला १५ जूनपासून सुरुवात होईल. ८ जून रोजी मृग नक्षत्रास सुरुवात होणार असली तरी २२ जूननंतर पावसाला सुरुवात होऊन खरिपाच्या पेरण्यांना प्रारंभ होईल. ऑक्टोबरपर्यंत भरपूर पाऊस होणार असल्याचा अंदाज पंचांगकर्त्यांनी वर्तविला आहे.
२०२३ मध्ये चांगला पाऊस होणार : पंजाब डक
प्रत्येक भूभागाला एकच समुद्र आहे. मात्र महाराष्ट्राच्या बाजूला अरबी व बंगालच्या खाडीचे असे दोन समुद्र आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात दरवर्षी ७ जूननंतर पाऊस होतोच. इलनिनो व लालीना या समुद्रातील प्रक्रिया आहेत. सध्या समुद्रात इलनिनोची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे दुष्काळ पडतो, अशी अफवा सुरू आहे. शेतकऱ्यांनी या अफवेवर विश्वास ठेवू नये. २०२३ मध्ये चांगला पाऊस होणार आहे. शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन हवामान तज्ज्ञ पंजाब डक यांनी केले आहे.
कलियुगाचे सहा शककर्ते, ४ लक्ष २६ हजार ८७६ वर्षे शिल्लक !...
कलियुगात सहा शककर्ते आहेत. प्रथम इंद्रप्रस्थात युधिष्ठिर (धर्मराज) झाला. त्याचा शक ३ हजार ४४ वर्षे, दुसरा उज्जयिनीत विक्रम झाला. त्याचा शक १३५ वर्षे, तिसरा पैठण येथे शालिवाहन. त्याचा शक १८ हजार वर्षे. चौथा वैतरिणी नदीच्या काठी विजयाभिनंदन होईल. त्याचा शक १० हजार वर्षे, पाचवा गौड देशात धारातीर्थी नागार्जुन होईल. त्याचा शक ४ लक्ष वर्षे, सहावा कोल्हापूर प्रांतात कल्की होईल. त्याचा शक ८२१ वर्षे. कलियुगातल्या एकूण वर्षातून ५१२४ वर्षे मागे पडली व ४ लक्ष २६ हजार ८७६ वर्षे शिल्लक आहेत.