कळंब तालुक्याला पावसाचा तडाखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:34 AM2021-05-11T04:34:57+5:302021-05-11T04:34:57+5:30
कळंब तालुक्यात मागच्या दहा दिवसांपासून अवकाळीचे ढग घोंघावत आहेत. यामुळे दररोज विविध भागांत अवकाळी पावसाचा तडाखा बसत आहे. यासोबत ...
कळंब तालुक्यात मागच्या दहा दिवसांपासून अवकाळीचे ढग घोंघावत आहेत. यामुळे दररोज विविध भागांत अवकाळी पावसाचा तडाखा बसत आहे. यासोबत असलेल्या वादळी वारे, जोरदार मेघगर्जना यामुळे सध्या पावसाळ्याची अनुभूती येत आहे.
रविवारी दुपारपासून आडसूळवाडी, भाटसांगवी, सात्रा, भोगजी, आथर्डी, आदी भागाला या अवकाळी पावसाने झोडपून काढले. यात आडसूळवाडी येथील कैलास आडसूळ, श्रीधर गवारे, कल्याण काकडे, शांतीनाथ शिंदे, आदी सात शेतकऱ्यांच्या जनावरांच्या गोठ्याचे मोठे नुकसान झाले.
याशिवाय अंकुश काकडे, अशोक भोंग, आदींच्या घरांचे नुकसान झाले. एका चालू बांधकामाच्या विटांनी बांधकाम केलेल्या तीन भिंती कोसळल्या, तर एका घरावर झाड कोसळले आहे. भाटसांगवी येथील आप्पा कोल्हे यांच्या फूल शेतीचे नुकसान झाले आहे.
तलाठ्यांनी केली पाहणी...
आडसूळवाडी येथील काही शेतकर्यांचे अवकाळी पावसाने नुकसान झाल्याची माहिती मिळाल्यानंतर तलाठी प्रवीण पालखे यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देत पाहणी केली. यावेळी उपसरपंच चंद्रसेन आडसूळ उपस्थित होते. तलाठी पालखे यांनी यासंदर्भात तहसीलदार यांना अहवाल सादर केला आहे.