महात्मा फुले यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारा; उस्मानाबादेत सावता परिषदेची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 06:02 PM2018-11-28T18:02:09+5:302018-11-28T18:02:48+5:30
क्रांतीसूर्य महात्मा फुले यांचे आंतरराष्ट्रीय स्मारक उभारण्यात यावे, या मागणीसाठी मागील काही वर्षांपासून शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे.
उस्मानाबाद : क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीराव फुले यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्यात यावे, ‘ओबीसी’चे आरक्षण अबाधित ठेऊन मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे आदी मागण्यांसाठी सावता परिषदेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज धरणे आंदोलन करण्यात आले.
क्रांतीसूर्य महात्मा फुले यांचे आंतरराष्ट्रीय स्मारक उभारण्यात यावे, या मागणीसाठी मागील काही वर्षांपासून शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. परंतु, शासन सदरील मागणीच्या अनुषंगाने गांभीर्याने विचार करीत नाही. त्यामुळे हा प्रश्न आजही प्रलंबित आहे. सदरील मागणी तातडीने निकाली काढण्यासोबतच महिला व बहुजन शिक्षणाचे पुरस्कर्ते महात्मा ज्योतीरा फुले यांच्या जयंतीदिनी शिक्षक दिन म्हणून पाळण्यात यावा, ओबीसी वित्त व विकास महामंडळास ५०० कोटीची भरीव तरतूद करण्यात यावी आदी मागण्यांसाठी सावता परिषदेच्या वतीने जिल्हाध्यक्ष सोमनाथ माळी यांच्या नेतृत्वाखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
आंदोलनामध्ये डॉ. सुरेश माळी, सतीश फुटाने, विवेक मुळे, सुनिल माळी, महादेव माळी, शिवाजी व्यवहारे, बापू शिंदे, दिलीप माळी आदींनी सहभाग नोंदविला. दरम्यान, जिल्हा परिषद अध्यक्ष नेताजी पाटील, राष्ट्रवादी सदस्य महेंद्र धुरगुडे, अॅड. दत्तात्रय देवळकर यांनी आंदोलनस्थळी जावून आंदोलनास पाठींबा दर्शविला.
या आहेत प्रमुख मागण्या...
- जातीनिहाय जनगणना करून आकडेवारी जाहीर करावी.
- क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा भरतरत्न पुरस्काराने सन्मान करावा.
- पुणे येथील भीडेवाड्यास राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करावे.
- ओबीसी मंत्रालयामार्फत ओबीसीतील शेतकरी, कामगार, महिला, विद्यार्थी व युवक यांच्यासाठी योजना तयार कराव्यात.
- ओबीसी विद्यार्थ्यांसाठीची व्यावसाय अभ्यासक्रमाची बंद करण्यात आलेली शिष्यवृत्ती पूर्ववत सुरू करावी.
- स्थगित करण्यात आलेली नोकर भरती तातडीने करावी.