'शिवस्वराज्य'ला दांडी; राणा पाटलांच्या पक्षांतर चर्चेला बळ !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2019 06:42 PM2019-08-26T18:42:40+5:302019-08-26T18:43:47+5:30
डॉ. पद्मसिंह पाटील व त्यांचे सुपूत्र आमदार राणाजगजितसिंह पाटील हे दोघेही सभेला गैरहजर होते.
उस्मानाबाद : गेल्या काही दिवसांपासून उस्मानाबाद राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री आ राणा पाटील यांच्या पक्षांतराची चर्चा जोरात आहे. या चर्चेचे स्वतः पाटील यांनी दोन वेळा खंडन केले असले तरी सोमवारी जिल्ह्यात दाखल झालेल्या शिवस्वराज्य यात्रेला पाटील अनुपस्थित राहिल्याने पक्षांतर चर्चेला चांगलेच बळ मिळाले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने काढण्यात आलेली शिवस्वराज्य यात्रा सोमवारी वाशी शहरामध्ये दाखल झाली. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार डॉ अमोल कोल्हे, महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, आ सतीश चव्हाण, आ राहुल मोटे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडलाही. मात्र, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे विश्वासू माजीमंत्री व पक्षाच्या संस्थापकापैकी एक असलेले डॉ. पद्मसिंह पाटील व त्यांचे सुपूत्र आमदार राणाजगजितसिंह पाटील हे दोघेही सभेला गैरहजर होते.जिल्ह्यात प्रदेश पातळीवरचा एखादा कार्यक्रम होतोय अन हे दोघे त्यास उपस्थित नाहीत, बहुधा असे कधी घडलेच नाही. त्यामुळेच आमदार पाटील यांच्या पक्षांतराच्या चर्चेला अधिक बळ मिळाले आहे.
गेल्या महिनाभरापासून राणाजगजिसिंह पाटील हे भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू आहे. त्यांनी स्वतः दोन वेळा प्रसिद्धीपत्रक काढून या चर्चेचे खंडन केले होते. तरीही चर्चा थांबत नव्हत्या. सोमवारच्या कार्यक्रमातील अनुपस्थितीने नागरिकांत पुन्हा पक्षांतराच्या चर्चेला जोर चढला आहे.
माजीमंत्री डॉ. पाटील हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू सहकारी आहेत. एवढेच नाही तर ते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सख्खे मेहुणेही आहेत. त्यांनी जिल्ह्यात पक्षाचा मोठा विस्तार जिल्ह्यात केला आहे. राणा पाटील यांनीही त्यांचा वारसा पेलून धरला आहे. पक्षांतर झाल्यास राष्ट्रवादीसाठी हा मोठा धक्का असणार आहे.
आपण पूर्वकल्पना दिली होती : राणा पाटील
दोन दिवसांपूर्वी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे उस्मानाबाद येथे आले असताना आमची जिल्ह्यातील सध्याच्या राजकीय स्थितीवर दीर्घ चर्चा झाली होती. त्याचवेळी काही अनिवार्य काम असल्याने सोमवारी आपणास मुंबईत थांबावे लागणार होती. तशी पूर्वकल्पना तेव्हाच प्रदेशाध्यक्षांना दिली होती. काही महत्वाच्या कामामुळेच आपणास कार्यक्रमास उपस्थित राहता आले नाही, अशी प्रतिक्रिया आ राणा पाटील यांनी दिली.