भूम तालुक्यात चोरट्यांनी पळविला पावणेपाच लाखाचा मुद्देमाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2018 07:27 PM2018-10-13T19:27:27+5:302018-10-13T19:28:34+5:30
चोरट्यांनी घरफोडी करून रोख रक्कम, सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह पावणे पाच लाखाचा मुद्देमाल लंपास केला़
भूम (उस्मानाबाद ) : चोरट्यांनी घरफोडी करून रोख रक्कम, सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह पावणे पाच लाखाचा मुद्देमाल लंपास केला़ ही घटना भूम तालुक्यातील हिवरा येथे शनिवारी पहाटेच्या सुमारास घडली़
तालुक्यातील हिवरा येथील शेतकरी दशरथ रुद्राप्पा सावंत यांचे भूम - उस्मानाबाद रोडवर घर आहे़ शनिवारी पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी घराचे मुख्य गेटचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला़ घरातील पत्राच्या पेटीमध्ये ठेवलेले रोख १ लाख ८० हजार रुपये, ७० हजार रूपये किंमतीच्या पाच ग्रॅमच्या सोन्याच्या सात अंगठ्या, एक लाख रूपये किंमतीचे ५० ग्रॅम सोन्याचे गोप, ५० हजार रूपये किंमतीचे २५ ग्रॅम वजनाचे ब्रासलेट, २० हजार रूपये किंमतीचे १० ग्रॅम सोन्याची बोरमाळ, २० हजार रूपये किंमतीचे सात ग्रॅम सोन्याचे झुंबर, ३ ग्रॅम वजनाचे कानातील झुमके, ९ ग्रॅम वजनाचे गंठण, ५ ग्रॅमचे गंठण असा एकूण ४ लाख ७८ हजार हजार रुपयाचा माल चोरट्यांनी पळवला.
दशरथ सावंत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भूम पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तपास पोनि माधव सुर्यवंशी हे करत आहेत. दरम्यान, घटनेनंतर पोलिसांनी श्वान पथकाला पाचरण केले होते़ श्वान पथकाने घटना स्थळापासून जवळ असलेल्या बांधापर्यंत माग काढला़ त्यानंतर श्वान तेथेच घुटमळले़ तज्ज्ञांनी घटनास्थळावरील ठसे घेतले आहेत़ चोरांच्या शोधार्थ पथक पाठविल्याचे पोलिसांनी सांगितले़
भारनियमनाचा फटका
हिवरा गावात रात्रीचे भारनियमन सुरू आहे़ शेतकरी दशरथ सावंत यांच्या पत्नी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास दळण आणण्यासाठी गेल्या होत्या़ पडलेला अंधार आणि घरी कोणी नसल्याची संधी साधत चोरट्यांनी सावंत यांच्या घरातील मुद्देमाल लंपास केला़ सावंत यांच्या पत्नी घरी आल्यानंतर ही घटना समोर आली़