तेर येथे कार्यक्रमाचे बॅनर फाडल्याने बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2018 04:08 PM2018-12-10T16:08:40+5:302018-12-10T16:12:24+5:30

गावातील मुख्य चौकात बॅनर लावण्यात आले होते़ हे बॅनर रविवारी रात्री अज्ञात समाजकंटकांनी फाडून टाकले़

Rastaroko at ter due to torn banner of the event | तेर येथे कार्यक्रमाचे बॅनर फाडल्याने बंद

तेर येथे कार्यक्रमाचे बॅनर फाडल्याने बंद

googlenewsNext

तेर (उस्मानाबाद ) : तेर येथे मातंग समाज अस्तित्व परिषदेनिमित्त लावलेले बॅनर फाडल्याची घटना सोमवारी सकाळी समोर आली़ यामुळे संतप्त लहुजी शक्ती सेनेच्या पदाधिकाऱ्यांसह नागरिकांनी सोमवारी सकाळी गाव बंदची हाक दिली़ आरोपींवर कारवाई करावी, या मागणीसाठी गावातील मुख्य रस्त्यावर टायर जाळून रास्तारोको आंदोलन करण्यात आले.

उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे लहुजी शक्ती सेनेच्या वतीने रविवारी मातंग समाज अस्तित्व परिषदेचे आयोजन करण्यात आले होते़ त्यानिमित्त गावातील मुख्य चौकात बॅनर लावण्यात आले होते़ हे बॅनर रविवारी रात्री अज्ञात समाजकंटकांनी फाडून टाकले़ ही घटना सोमवारी सकाळी समोर येताच लहुजी शक्ती सेनेच्या पदाधिकाऱ्यांसह मातंग समाजातील नागरिकांनी या कृत्याचा निषेध करीत गाव बंदची हाक दिली़ तसेच तेर- उस्मानाबाद मार्गावरील रामलिंग आप्पा लामतुरे पुराण वस्तू संग्रहालय समोर रस्तारोको आंदोलन सुरू केले़ महापुरूषांची छायाचित्रे असलेले बॅनर फाडून समाजाच्या भावना दुखावणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी आंदोलकांनी लावून धरली होती़

यावेळी ढोकी पोलीस ठाण्याचे पोउपनि नंदकुमार दंडे, सरपाळे यांनी गावात चोख बंदोबस्त लावला़ पोलिसांनी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला़ मात्र, आंदोलक मागणीवर ठाम होते़ यावेळी लहुजी शक्ती सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष संभाजी कांबळे यांनी पोलिसांमार्फत पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन कारवाई करण्याची मागणी केली़ अखेर उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन कटेकर यांनी आंदोलनस्थळी धाव घेऊन कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले़ यावेळी शांतता कमिटीची बैठकही घेण्यात आली़ गावात कोणताही अनुचित प्रकार घडू  नये, यासाठी तेरमध्ये दंगल नियंत्रण पथकासह मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

 

Web Title: Rastaroko at ter due to torn banner of the event

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.