रियल इस्टेट बाजार जोरात; घर, प्लॉट विक्रीच्या श्रावणसरी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:36 AM2021-08-12T04:36:55+5:302021-08-12T04:36:55+5:30
उमरगा : एकीकडे गेले वर्षभर कोरोनामुळे उद्योगधंदे व आर्थिक व्यवहार ठप्प झाले असताना, घर, प्लॉट जमीन खरेदी-विक्री मात्र जोरात ...
उमरगा : एकीकडे गेले वर्षभर कोरोनामुळे उद्योगधंदे व आर्थिक व्यवहार ठप्प झाले असताना, घर, प्लॉट जमीन खरेदी-विक्री मात्र जोरात झाली आहे. बांधकाम साहित्याचे कारखाने बरेच दिवस बंद राहिल्याने उत्पादन कमी प्रमाणात झाले आहे. सध्या बांधकामे वाढत असल्याने मागणी तसा पुरवठा होत नाही. पर्यायाने बांधकामाच्या साहित्याचे दर प्रचंड प्रमाणात वाढले आहेत. कोरोनामुळे शहरातील लोकांची ग्रामीण भागात गुंतवणूक करण्याची मानसिकता वाढली आहे. यामुळे प्लॉट, जमीन व घरांच्या किमतींत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. गेल्या दीड वर्षाच्या कोरोना संसर्गाच्या कालावधीत बांधकाम साहित्य व प्लॉटच्या किमतींत ३० ते ३५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. डिझेलच्या वाढत्या किमतीचाही परिणाम भाववाढीवर झाला आहे. उमरगा शहरातील प्लॉटिंगचे दर लातूर-उस्मानाबादपेक्षाही जास्त असल्याने नोकरदार वर्ग व माेठ्या शहरांतील गुंतवणूकदार गुंतवणूक म्हणून घर व प्लॉट खरेदी करीत असल्याची माहिती बिल्डर संजय चालुक्य व विवेक बप्पा हाराळकर यांनी दिली.
कोणत्या महिन्यात किती रजिस्ट्री?
जानेवारी - ३६७
फेब्रुवारी - ४४७
मार्च - ४७७
एप्रिल - १२३ लॉकडाऊन
मे - १०८ लॉकडाऊन
जून - ५२६
जुलै - ५०३
दररोज १५ रजिस्ट्री
लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर एप्रिल व मेमध्ये रजिस्ट्री कार्यालयातील व्यवहार कमी झाला होता. जून महिन्यापासून पुन्हा रिअल इस्टेटच्या मार्केटने उसळी घेतली आहे. सरासरी रोज १५ रजिस्ट्रीचे व्यवहार गेल्या सात महिन्यांत झाले आहेत.
गुंतवणूक म्हणून घर घेणारेच अधिक
घर, प्लॉट व बांधकाम साहित्याचे दर गगनाला भिडले आहेत. गेल्या दीड वर्षात ३० ते ३५ टक्के दर वाढले आहेत. सध्या नोकरदार वर्ग, डॉक्टर, इंजिनिअर व गुंतवणूक म्हणून घर खरेदी करणारे अधिक आहेत, अशी माहिती बिल्डर संजय चालुक्य व विवेक बप्पा हाराळकर यांनी दिली.
म्हणून वाढल्या घरांच्या किमती !
प्लॉट-उमरगा शहरात प्लॉटच्या किमती १० ते ३० लाख रुपये प्रतिगुंठा आहेत.
सिमेंट-सिमेंटचे भाव ३५० ते ३७० रुपये प्रतिगोणी झाले आहेत.
स्टील- स्टीलच्या भावात खूप मोठी वाढ झाली असून ते ५५ ते ६० हजार रुपये टन झाले आहे.
वीट- विटांचे दर ४५०० ते ५००० रुपये प्रतिहजार झाले आहेत.
वाळू - सध्या बांधकामासाठी नदीची वाळू मिळणे कठीण झाले असून १० हजार रुपये ब्रास रेट आहे. त्यामुळे क्रशसँड ५ हजार रुपये प्रतिब्रास या दराने घेऊन वापरली जात आहे.
घर घेणे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर
उमरगा शहरातील प्लॉटच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत. सध्या १० लाख ते ३० लाख रुपये प्रतिगुंठा भाव आहेत. त्यामध्ये सिमेंट, वाळू, विटा, स्टील या बांधकाम साहित्याच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत. तयार साधारण दीड हजार चौरस फूट घराला ४५ ते ५० लाख रुपये लागतात. यामुळे घर घेणे सर्वसामान्य माणसाच्या आवाक्यात राहिलेले नाही.
- रणजित चौधरी, उमरगा
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे बांधकाम साहित्याच्या कंपन्या बंद होत्या. त्यामुळे उत्पादन कमी प्रमाणात झाले आहे. आता बांधकाम मोठ्या प्रमाणात सुरू झाल्याने मागणीनुसार पुरवठा होत नाही; त्यामुळे बांधकाम साहित्याचे दर प्रचंड वाढले आहेत. प्लॉटिंगचे दरही वाढलेले असल्याने सर्वसामान्य माणसाला घर घेणे व बांधणे आवाक्याबाहेर गेलेले आहे.
- विवेक टाचले, उमरगा