उसतोड कामगारांची नोंदणी करा, उस्मानाबादेत कामगार संघटनेचे हलगीनाद आंदोलन
By सूरज पाचपिंडे | Published: October 12, 2022 05:30 PM2022-10-12T17:30:24+5:302022-10-12T17:30:43+5:30
राज्यातील अनेक ऊसतोड कामगारांची शासन स्तरावर नोंदणी नाही.
उस्मानाबाद : महाराष्ट्रातील ऊसतोड कामगार बहुल जिल्ह्यातील कामगारांची त्वरीत नोंदणी करुन त्यांना विविध कल्याणकारी योजनांचा लाभ द्यावा, या मागणीसाठी तुळजाभवानी कामगार संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून हलगीनाद आंदोलन केले.
राज्यातील अनेक ऊसतोड कामगारांची शासन स्तरावर नोंदणी नाही. परिणामी, ऊसतोड कामगार शासनाच्या कल्याणकारी योजनांपासून वंचित राहतात. त्यामुळे ऊसतोड कामगार व त्यांच्या पाल्यांना हलाखीचे व असुरक्षिततेचे जीवन जगावे लागते. ऊसतोड कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी बुधवारी तुळजाभवानी कामगार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून मोर्चास प्रारंभ झाला. मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.
या ठिकाणी हलगीनाद आंदोलन करण्यात आले. जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांची त्वरीत नोंदणी करुन शासनाच्या योजनांचा लाभ द्यावा, वाहक-चालक यांना विमा योजना लागू करावी, हार्वेस्टरप्रमाणे कामगारांना ऊसतोडणी दर देण्यात यावा, ऊसतोड कामगारांना घरकूल योजनेचा लाभ द्यावा, ऊसतोडणी कामगारांच्या मुलांसाठी वसतिगृह सुरु करावे, अशा मागण्या यावेळी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आल्या. आंदोलनात संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश पवार, संदिप पवार, उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष संतोष राठोड, राजु पवार, प्रताप राठोड, रमेश चव्हाण, संजय पवार आदीं पदाधिकारी सहभागी झाले होते.