उस्मानाबादकरांना दिलासा, जिल्ह्यातील १०० प्रकल्प ओव्हरफ्लो
By सूरज पाचपिंडे | Published: September 8, 2022 05:33 PM2022-09-08T17:33:17+5:302022-09-08T17:34:11+5:30
उस्मानाबाद जिल्ह्यात मोठा १, मध्यम १७, लघु २०८, असे एकूण २२६ प्रकल्प आहेत.
उस्मानाबाद : जिल्ह्यात जुलै महिन्यापासून सर्वत्र पाऊस सक्रिय झाला आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील २२६ प्रकल्पांपैकी १०० प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत, २६ प्रकल्पांमध्ये ७५ टक्क्यांपेक्षा अधिक तर २२ प्रकल्पांत ५० टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात मोठा १, मध्यम १७, लघु २०८, असे एकूण २२६ प्रकल्प आहेत. प्रकल्पाची साठवण क्षमता ७२६.९६२ दलघमी इतकी आहे. या प्रकल्पातून अनेक शहरे व गावांना पाणीपुरवठा होता. जून महिन्यात जिल्ह्यातील काहीच भागांत दमदार पाऊस झाला, तर काही भागांत पावसाने पाठ फिरविल्याने जूनअखेरीस केवळ एक प्रकल्प भरला होता. ११ प्रकल्प कोरडेठाक होते. मात्र, जुलै महिन्यात सर्वच भागात पाऊस सक्रिय झाला. त्यामुळे बहुतांश प्रकल्पातील पाणीसाठ्यात वाढ झाली. ऑगस्ट महिन्यातही काही भागांत पाऊस झाला.
परिणामी, १८ ऑगस्टपर्यंत ८० प्रकल्प ओव्हरफ्लो झाले होते. त्यानंतर पावसाने उघडीप दिल्याने पाणीसाठ्यात वाढ झाली नाही. मात्र, सप्टेंबर महिन्यात पावसाने हजेरी लावल्याने प्रकल्पात पाणीसाठा वाढू लागला आहे. ८ सप्टेंबर १०० प्रकल्प तुडूंब भरले आहेत. २६ प्रकल्पात ७५ टक्क्यापेक्षा अधिक पाणीसाठा आहे. २२ प्रकल्पात २६ ते ५० टक्के, २५ प्रकल्पात २६ ते ५० टक्के, ४० प्रकल्पात ४० टक्केपेक्षा कमी पाणीसाठा आहे. एकूण प्रकल्पात ४४६.५९ दलघमी उपयुक्त पाणीसाठा आहे. उपयुक्त पाणीसाठ्याची टक्केवारी ६१.४३ इतकी आहे.