प्रमाणपत्र नसले तरीही मोबाइल नंंबर लक्षात ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:22 AM2021-07-01T04:22:55+5:302021-07-01T04:22:55+5:30

उस्मानाबाद : लसीकरणाला ग्रामीण भागासह शहरी भागात वेग आला आहे. यात शहरातील प्रत्येकाकडे स्मार्ट मोबाइल असल्याने ते लसीकरणाचे प्रमाणपत्र ...

Remember mobile number even if you don't have certificate | प्रमाणपत्र नसले तरीही मोबाइल नंंबर लक्षात ठेवा

प्रमाणपत्र नसले तरीही मोबाइल नंंबर लक्षात ठेवा

googlenewsNext

उस्मानाबाद : लसीकरणाला ग्रामीण भागासह शहरी भागात वेग आला आहे. यात शहरातील प्रत्येकाकडे स्मार्ट मोबाइल असल्याने ते लसीकरणाचे प्रमाणपत्र आपल्याकडे डाऊनलोड करून घेतात. तसेच त्यांचे प्रिंटआउट काढून दुसऱ्या डोससाठी आपल्याजवळ जपून ठेवत आहेत. मात्र, ग्रामीण भागातील प्रत्येक व्यक्तीकडे स्मार्ट मोबाइल नाही. त्यामुळे अशा नागरिकांना लस घेताना अडचणींना सामाेरे जावे लागते. दुसरा डोस घेताना प्रमाणपत्र नसले तरी मोबाइल क्रमांक लक्षात ठेवावा, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. ग्रामीण भागात प्रत्येक व्यक्तीकडे स्मार्टफोन नाही. अशात ते अन्य कुणाचा मोबाइल नंबर देऊन रजिस्ट्रेशन करवून घेतात. मात्र दुसरा डोस घेताना त्यांच्याकडे प्रमाणपत्र नसल्याने डोस कसा घ्यायचा, असा प्रश्न पडतो. मात्र अशा नागरिकांनी गोंधळून न जाता न चुकता वेळेवर लस घ्यावी. प्रमाणपत्र नसल्यास संबंधित व्यक्तीने फक्त मोबाइल नंबर कोणाचा दिला हे आठवणीत ठेवणे गरजेचे आहे. त्यावरून केंद्रावर त्यांचे प्रमाणपत्र काढून घेता येते. विशेष म्हणजे मोबाइल नंबर आठवत नसल्यास केंद्रावरील कर्मचाऱ्यांच्या रजिस्ट्ररमध्ये नाेंद आहेच. त्या रजिस्ट्ररमधून त्या व्यक्तीचे नाव शोधता येते व त्यावरून संबंधित व्यक्तीस दुसरा डोस देता येतो.

कोट

नागरिकांनी पहिला डोस घेताना आपलाच मोबाइल नंबर रजिस्ट्रेशनसाठी द्यावा किंवा जवळील व्यक्तीचा नंबर द्यावा. असे नसल्यास केंद्रावरील रजिस्ट्ररमध्ये नोंद असते. त्याकरिता मोबाइल क्रमांक लक्षात ठेवणे गरजेचे असते. नागरिकांनी प्रमाणपत्र नसले तरी लसीकरण केंद्रावर जाऊन नोंदणी करावी.

डॉ. कुलदीप मिटकरी, लसीकरण अधिकारी

मोबाइल नंबर महत्त्वाचा

ग्रामीण भागात पहिला डोस घेताना कित्येकांनी कुणाचा नंबर दिला हे त्यांनाच आठवत नसल्याने दुसरा डोस घेताना त्यांच्याकडे काहीच पुरावा नाही. अशात मोबाइल नंबरवरून पूर्ण माहिती काढता येते.

पहिल्या डोसचे प्रमाणपत्र मिळाल्यास

ग्रामीण भागातील प्रत्येकाकडे आताही स्मार्ट मोबाइल नाही, तर अनेकांकडे साधा मोबाइलही नाही. अशात त्यांनी कुटुंबातील, नात्यातील किंवा शेजारच्या व्यक्तीचा मोबाइल नंबर रजिस्टर करून घेतला आहे. मात्र दुसरा डोस घेताना त्यांच्याकडे प्रमाणपत्र नसल्याने अडचण येत असते. मात्र असे झाल्यास मोबाइल नंबर लक्षात ठेवावा. त्यानंतर लसीकरण केंद्रावरील कर्मचाऱ्यांकडे रजिस्टरमध्ये नोंद असते व त्यावरूनही नाव शोधता येते.

लसीकरणावेळी ही घ्या काळजी

लसीचा पहिला डोस घेताना रजिस्ट्रेशन करावे लागते. यासाठी मोबाइल क्रमांक द्यावा लागतो व त्यावर आलेल्या मेसेजवरून प्रमाणपत्र डाऊनलोड करता येते. यामुळे मोबाइल नंबर आपलाच द्यावा. स्मार्टफोन नसल्यास आपल्या कुटुंबातील किंवा जवळील व्यक्तीचा नंबर द्यावा.

डोस घेतल्यानंतर आपल्या मोबाइलमध्ये प्रमाणपत्र डाऊनलोड करून घ्यावे. स्मार्टफोन नसल्यास संबंधिताकडून प्रमाणपत्राची हार्डकॉपी काढून जवळ ठेवावी.

दुसरा डोस घेताना मोबाइलमधील प्रमाणपत्र किंवा प्रमाणपत्राची हार्ड कॉपी न्यावी. हे नसल्यास मोबाइल नंबर कुणाचा दिला होता हे लक्षात ठेवावे.

Web Title: Remember mobile number even if you don't have certificate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.