'कुलगुरू हटाव, विद्यापीठ बचाव'; उपकेंद्राच्या वर्धापन सोहळ्यात घोषणाबाजी
By चेतनकुमार धनुरे | Updated: August 16, 2023 13:21 IST2023-08-16T13:20:53+5:302023-08-16T13:21:07+5:30
उपकेंद्रातील रखडलेल्या कामांचा जाब विचारण्यासाठी धरणे आंदोलनाचे आयोजन केले होते. आंदोलन सुरु असतानाच वर्धापनाचा सोहळाही सुरु होता.

'कुलगुरू हटाव, विद्यापीठ बचाव'; उपकेंद्राच्या वर्धापन सोहळ्यात घोषणाबाजी
धाराशिव : धाराशिव येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्राच्या वर्धापन सोहळ्यात बुधवारी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. उपकेंद्रातील रखडलेली कामे मार्गी का लागत नाहीत, असा सवाल विचारत पदाधिकाऱ्यांनी उपकेंद्रात धरणे आंदोलनही केले.
१६ ऑगस्ट रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्राचा वर्धापनदिन सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यास आमदार राणाजगजितसिंह पाटील, कुलगुरु डॉ.प्रमोद येवले, प्र-कुलगुरु डॉ.श्याम शिरसाठ यांची प्रमुख उपस्थिती होती. दरम्यान, याचवेळी महाविकास आघाडीच्या घटकपक्षातील पदाधिकाऱ्यांनी उपकेंद्रातील रखडलेल्या कामांचा जाब विचारण्यासाठी धरणे आंदोलनाचे आयोजन केले होते. आंदोलन सुरु असतानाच वर्धापनाचा सोहळाही सुरु होता. यावेळी काही पदाधिकाऱ्यांनी सभागृहात जावून रखडलेल्या कामांचा कार्यक्रमातच जाब विचारुन घोषणाबाजी केली.
कुलगुरू हटाव, विद्यापीठ बचाव, अशा जोरदार घोषणाबाजीने काही काळ गोंधळाचे वातावरण होते. उपकेंद्रातील व्यवस्थापनशास्त्र इमारत, वाचनालय इमारत तसेच संचालक निवासस्थानासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर आहे. या कामांच्या निविदा होवून ठेकेदारही नियुक्त करण्यात आला आहे. मात्र, आठ महिने उलटूनही कामांना सुरुवात होत नसल्याने हा निधी ठेकेदाराला कामाविनाच द्यावा लागेल. या कामांसाठी नेमका विलंब का होत आहे, असा जाब आंदोलन कर्त्यांच्या वतीने माजी सिनेट सदस्य संजय निंबाळकर यांनी विचारला. यावेळी प्रतापसिंह पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत पाटील, शिला उंबरे, ठाकरे गटाचे शहराध्यक्ष सोमनाथ गुरव यांच्यासह शिक्षणप्रेमी नागरिक उपस्थित होते.