‘झेडपी’तील दाेघांची बदली, दाेघांना मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:36 AM2021-08-12T04:36:16+5:302021-08-12T04:36:16+5:30
उस्मानाबाद : जिल्हा परिषदेतील अनेक विभाग प्रमुखांचा तीन वर्षांचा कार्यकाळ सरून गेला आहे. गतवर्षी काेराेनामुळे बदलीस पात्र अधिकाऱ्यांना मुदतवाढ ...
उस्मानाबाद : जिल्हा परिषदेतील अनेक विभाग प्रमुखांचा तीन वर्षांचा कार्यकाळ सरून गेला आहे. गतवर्षी काेराेनामुळे बदलीस पात्र अधिकाऱ्यांना मुदतवाढ देण्यात आली हाेती. त्यामुळे काहींचा कार्यकाळ तर चार ते पाच वर्षांचा झाला आहे. अशा अधिकाऱ्यांचे बदली आदेश धडकण्यास सुरूवात झाली आहे. साेमवार आणि मंगळवार या दाेन दिवसांत कृषी तसेच पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश आले, तर सामान्य प्रशासन आणि महिला व बालविकास विभागाच्या प्रमुखांना मुदतवाढ देण्यात आली आहे.
मागील दाेन वर्षांपासून काेराेनाचे संकट पाठ साेडायला तयार नाही. मागील वर्षी ऐन बदल्यांच्या काळात काेराेना संसर्गाने प्रचंड गती घेतली हाेती. त्यामुळे तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झालेल्या जिल्हा परिषदेतील वर्ग-१च्या अधिकाऱ्यांना मुदतवाढ मिळाली हाेती. यंदाही बदल्या हाेतात की नाही, अशी चर्चा सुरू हाेत असतानाच साेमवारपासून पात्र अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश येऊ लागले आहेत. साेमवारी जिल्हा कृषी विकास अधिकारी डाॅ. टी. जे. चिमनशेट्टे यांच्या बदलीचा आदेश धडकला. त्यांची नांदेड जिल्हा परिषदेत याच पदावर बदली झाली आहे. त्यांच्या जागी लातूर जिल्ह्यातील उदगीर येथील उपविभागीय कृषी अधिकारी महेशकुमार तीर्थकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डाॅ. नामदेव बाबुराव आघाव यांची गंगाखेड (जि. परभणी) येथे बदली झाली. त्यांच्या जागी रत्नागिरी येथील डाॅ. यतीन भैरवनाथ पुजारी यांची नियुक्ती झाली आहे. बदली व नियुक्तीचे हेे आदेश जिल्हा परिषद सामान्य प्रशासन विभागास प्राप्त झाले आहेत.
चाैकट....
तुबाकले, निपाणीकर यांना मुदतवाढ
जिल्हा परिषद सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. संजय तुबाकले, महिला व बालकल्याण अधिकारी बळीराम निपाणीकर हे दाेन्ही अधिकारी बदलीसाठी पात्र हाेते. परंतु, शासनाने यांना मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे आणखी वर्षभर याच जिल्ह्यात काम करण्याची संधी त्यांना मिळाली आहे.
शिक्षणाधिकारी रूजू हाेणार कधी?
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाला काही वर्षांनंतर राठाेड यांच्या रूपाने नियमित शिक्षणाधिकारी लाभले. त्यांचा आदेश सामान्य प्रशासन विभागाला काही दिवसांपूर्वीच प्राप्त झाला आहे. हे पदही रिक्त आहे. मात्र, अद्याप ते रूजू झालेले नाहीत. त्यामुळे शिक्षणाधिकारी राठाेड रूजू हाेणार की नाहीत, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.