सात गुरूजींच्या नियुक्तीचा मागविला अहवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:30 AM2021-03-25T04:30:41+5:302021-03-25T04:30:41+5:30
आंतरजिल्हा बदलीने जिल्ह्यात ३९ शिक्षक आले हाेते. परंतु, काही प्रवर्गाच्या जागा रिक्त नसतानाही त्या ऑनलाईन दाखविण्यात आल्या हाेत्या. त्यानुसार ...
आंतरजिल्हा बदलीने जिल्ह्यात ३९ शिक्षक आले हाेते. परंतु, काही प्रवर्गाच्या जागा रिक्त नसतानाही त्या ऑनलाईन दाखविण्यात आल्या हाेत्या. त्यानुसार अकरा शिक्षक जिल्ह्यात दाखल झाले हाेते. चाैकशीअंती शिक्षण विभागाने कार्यालयातील दाेघांना निलंबित केले हाेते. यानंतर चाैघा शिक्षकांना परत पाठविले. तर उर्वरित सात शिक्षक मात्र जिल्ह्यातच राहिले. केवळ ११ शिक्षकांच्या अनुषंगाने तक्रारी असतानाही जिल्हा परिषदेने पात्र २८ शिक्षकांना शाळेवर रूजू करून घेतले नाही. यानंतर जिल्हा परिषदेने शासनाकडे मार्गदर्शन मागविले. परंतु, हे मार्गदर्शन मागविताना वस्तुस्थिती शासनाला सादर केली नाही, असा आराेप राष्ट्रवदीचे गटनेते महेंद्र धुरगुडे यांनी केला. शासनाच्या मार्गदर्शनाचा फायदा घेता जागा नसतानाही सात शिक्षकांना रूजू करून घेतले, असे त्यांनी ग्रामविकास विभागाकडे केलेल्या तक्रारीत म्हटले हाेते. तक्रारीसाेबत काही दस्तावेजही त्यांनी सादर केले. हा सर्व प्रकार गांभीर्याने घेत ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना अभिप्रायासह तात्काळ अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता मुख्य कर्यकारी अधिकारी काय अहवाल देतात? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
चाैकट...
आंतरजिल्हा बदलीने आलेल्या सात शिक्षकांना जागा नसताना रूजू करून घेतले. मात्र मार्गदर्शन मागविताना ही बाब ग्रामविकास मंत्र्यांकडे मांडली नाही. त्यामुळे आपण याबाबतीत तक्रार केली. पुरावेही दिले आहेत. खात्री पटल्यानंतरच ग्रामविकास विभागाने तातडीने अहवाल मागविला आहे.
-महेंद्र धुरगुडे, गटनेता, राष्ट्रवादी काॅंग्रेस.