उस्मानाबादचे निवासी डॉक्टर संपावर, 8 महिन्यांपासून विद्यावेतन मिळेना
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2018 12:03 PM2018-02-14T12:03:56+5:302018-02-14T12:04:12+5:30
गेल्या आठ महिन्यांपासून विद्यावेतन न मिळालं असल्या कारणाने डॉक्टरांनी अखेर संप पुकारला आहे
उस्मानाबाद - उस्मानाबादचे निवासी डॉक्टर संपावर गेले आहेत. गेल्या आठ महिन्यांपासून विद्यावेतन न मिळालं असल्या कारणाने डॉक्टरांनी अखेर संप पुकारला आहे. संप पुकारण्यात आला असल्याने ओपीडी आणि आयपीडी बंद ठेवण्यात आलं आहे. मात्र अत्यावश्यक सेवा सुरु राहतील, असं डॉक्टरांनी स्पष्ट केलं आहे.
गेल्या आठ महिन्यांपासून विद्यावेतन न मिळालं असल्या कारणाने निवासी डॉक्टरांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागत आहे. विद्यावेतन न मिळाल्याने निवासी डॉक्टरांना साध्या गोष्टींसाठीही दुस-यांवर अवलंबून राहावं लागत असून साध्या गरजाही भागवता येत नाहीयेत. काही निवासी डॉक्टरांनी तर आपल्याला रिसर्च वर्कही थांबवावं लागलं असल्याचं सांगितलं आहे.
निवासी डॉक्टरांनी आयुर्वेद संचलनालयाशी पत्रव्यवहार करत आपलं गा-हाणं मांडलं. मात्र तिथेही त्यांची निराशा झाली. कोणतंही समाधानकारक उत्तर त्यांना देण्यात आलं नाही. फोनवर बोलणं झालं त्यावेळी आमच्याशी उर्मट भाषेत संवाद साधण्यात आला. “तुम्हाला काय करायचं ते करा” असं बेजबाबदार उत्तर देण्यात आलं असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. त्यामुळेच अखेर हतबल झालेल्या डॉक्टरांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला. याप्रकरणी वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांची आपण भेट घेणार आहोत असं काही डॉक्टरांनी सांगितलंय.