कौतुकास्पद! चार कोटींच्या लोकवाट्यातून होतोय सातशे वर्षांपूर्वीच्या मंदिराचा जिर्णोध्दार
By गणेश कुलकर्णी | Published: August 30, 2023 05:01 PM2023-08-30T17:01:31+5:302023-08-30T17:02:42+5:30
संपूर्ण मंदिराचे काम हे दगडी व घडीव कलाकुसरीत पूर्ण करण्यात येत आहे.
धाराशिव : तुळजापूर तालुक्यातील पिंपळा (खुर्द) गावचे श्रद्धास्थान असलेल्या ७०० वर्षांपूर्वीच्या शंभो महादेव मंदिराच्या जिर्णोद्धाराचे काम गावकऱ्यांनी हाती घेतले असून, यासाठी तब्बल चार कोटींचा लोकवाटा जमा करण्यात येत आहे. हे काम आता जवळपास ८० टक्के पूर्ण झाले आहे. विशेष म्हणजे, संपूर्ण मंदिराचे काम हे दगडी व घडीव कलाकुसरीत पूर्ण करण्यात येत आहे.
पिंपळा (खुर्द) गावात शंभू महादेवाचे पुरातन ७०० वर्षांपूर्वीचे मंदिर आहे. तशी नोंद शके १२४७ पिंडीवर कोरलेली आहे. या पुरातन मंदिराचा जीर्णोद्वार व्हावा व ते काम दगडी स्वरुपात व्हावे, असा मनोदय करून पुणे येथील दन आश्रम मठाचे मठाधिपती शांती ब्रम्ह तुकाराम भाऊ धनकर यांच्या प्रमुख उपस्थितीत गावात बैठक घेण्यात आली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली यासाठी गावकऱ्यांनी लोकवाटा जमा केला. यानंतर १० मार्च २०१७ रोजी मंदिर बांधकामास प्रारंभ झाला. दगडी बांधकामासाठी नेवासा व देगलूर येथून दगड आणण्यात आला असून, या दगडांवर घडीव प कोरीव कला रेखाटण्यासाठी परभणी जिल्हञयातील १० कलाकार मजूरही मुक्कामी राहून चार वर्षापासून मेहनत घेत आहेत. मंदिराचे बांधकाम दगडी कोरोव कलाकुसरीत सुरु आहे. हे बांधकाम ८० टक्के पूर्ण झाले असून, चार कोटीचा कोटीचा लोकवाटा या कामासाठी खर्च करण्याचा संकल्प गावकऱ्यांनी केला आहे. जीर्णोद्वाराच्या निर्णयामुळे ७०० वर्षांच्या महादेव मंदिराला नवे रूप निर्माण होणार आहे. यासाठी सर्व ग्रामस्थ परिश्रम घेत आहेत.
‘क’ वर्ग तीर्थ क्षेत्राचा दर्जा
पिपळा (खुर्द) गावातील पुरातन शंभो महादेव मंदिराला धाराशिव जिल्हा परिषदेने ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त करून दिला आहे. दर सोमवारी या मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होते. श्रावण महिन्यात महिनाभर मदिरात ग्रंथ पठण केले जाते. महाशिवरात्रीला तर भागातून दर्शनासाठी भाविकाची गर्दी होते. चैत्र महिन्यातील द्वादशीला शंभो महादेवाची मोठी यात्राही साजरी केली जाते. यात कावड काठ्याची मिरवणूक काढून प्रसादाचे भाविकांना वाटप केले जाते.