रस्ता काम सुरू झाल्याने बसफेऱ्या केल्या बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:33 AM2021-03-17T04:33:01+5:302021-03-17T04:33:01+5:30
पर्यायी मार्ग वापरण्यास नकार मुरुम : उमरगा तालुक्यातील केसरजवळगा ते बेळंब या रस्त्याचे काम मागील आठ दिवसांपासून सुरु काम ...
पर्यायी मार्ग वापरण्यास नकार
मुरुम : उमरगा तालुक्यातील केसरजवळगा ते बेळंब या रस्त्याचे काम मागील आठ दिवसांपासून सुरु काम सुरु करण्यात आले असून, यामुळे वाहनधारकांत समाधान व्यक्त होत आहे. परंतु, दुसरीकडे या मार्गावरून धावणाऱ्या विविध आगाराच्या दिवसभरातील २४ बसफेऱ्या आठ दिवसांपासून एसटी महामंडळाने बंद केल्या आहेत. यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असल्याचे दिसत आहे.
आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या प्रयत्नातून बेळंब केसरजवळगा या रस्त्यासाठी ४० लाख आणि केसरजवळगा ते आलूर फाटा रस्त्यासाठी ४० असा एकूण ८० लाखांचा निधी मंजूर झाला आहे. यातील सध्या बेळंब ते केसरजवळगा रस्त्याचे काम सुरु आहे. वास्तविक केसरजवळग्याला जाण्यासाठी बेळंब मार्गे एक आणि आलूर फाटा मार्गे दुसरा रस्ता आहे. सध्या यातील बेळंब - केसरजवळगा या मार्गावर काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे एसटी बसेस आलूर फाटा मार्गे बस करु शकतात. परंतु, उमरगा व अक्कलकोट आगाराने पर्यायी रस्ता असतानाही बसफेऱ्या बंद ठेवल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. शिवाय गेल्या आठ दिवसांपासून एसटीचे उत्पन्नही बुडाले.
एसटी वाहतूक बंद असल्याने प्रवाशांना सध्या खासगी वाहनाचा आधार घ्यावा लागत आहे. मुरुम ते केसरजवळगा हे अंतर दहा किलोमीटरचे असून एसटीला १५ रुपये प्रवासभाडे आहे. परंतु, खासगी वाहनचालक दुप्पट म्हणजेच ३० रुपये भाडे आकारत आहेत. त्यामुळे प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. त्यामुळे बांधकाम विभागाने लवकरात लवकर काम करुन रस्ता सुरळीत करावा. तसेच एसटीने पर्यायी मार्गावरून वाहतूक सुरु ठेवावी, अशी मागणी प्रवाशांतून होत आहे.
चौकट ः
चौकट ः
यासंदर्भात बेळंब -केसरजवळगा रस्ता कामाचे कंत्राटदार काळे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, रस्ता काम सुरु असले तरी वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध असल्याबाबतची माहिती आम्ही आगारप्रमुख उमरगा यांना दिली आहे. शिवाय, हे काम देखील येत्या तीन ते चार दिवसांत पूर्ण होईल. त्यानंतर बस सुरु करायला हरकत नाही.
चौकटः
बेळंब-केसरजवळगा रस्त्याचे काम मागील आठ दिवसांपासून सुरु आहे. त्यामुळे या मार्गे ये-जा करणाऱ्या बसेस बंद आहेत. पर्यायी मार्गाने बससेवा सुरु केल्यास अंतर वाढते. त्यामुळे प्रवाशांचे बसभाडे ही वाढते. त्यामुळे सध्या अक्कलकोट आगाराची सकाळची एक बस आणि उमरगा आगाराची दुपारची बस शालेय विद्यार्थ्यांसाठी दोन बस पर्यायी मार्गाने सुरु आहेत. रस्त्याचे काम ज्या दिवशी पूर्ण होईल त्या दिवसांपासून सर्व बसफेऱ्या पूर्ववत केल्या जातील.
- प्रसाद कुलकर्णी, आगार प्रमुख, उमरगा