तुळजापुरातील वर्दळीच्या रस्त्यावर पडली भेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:33 AM2021-02-16T04:33:29+5:302021-02-16T04:33:29+5:30
(फोटो : अजीत चंदनशिवे) तुळजापूर : तुळजापूर शहरातील वर्दळीच्या असलेल्या आठवडीबाजार ते शुक्रवार पेठ या रस्त्यावर मध्यभागी मोठी भेग ...
(फोटो : अजीत चंदनशिवे)
तुळजापूर : तुळजापूर शहरातील वर्दळीच्या असलेल्या आठवडीबाजार ते शुक्रवार पेठ या रस्त्यावर मध्यभागी मोठी भेग पडली असून, यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. विशेष म्हणजे, ही बाब पालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून देऊनही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप शहरवासीयांमधून केला जात आहे. मागील काही वर्षांत विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून शहरात विविध विकास कामे हाती घेण्यात आली होती. त्यातीलच हे रस्त्याचेही काम आहे, परंतु आठवडी बाजाराकडून शुक्रवार पेठ भागाकडे जाणाऱ्या रस्त्यावर अगदी मधोमध जवळपास दीडशे ते दोनशे फूट अंतराची मोठी भेग पडली असून, यामुळे कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. मधोमध ही भेग पडल्यामुळे येथून जाणाऱ्या वाहनाच्या चालकांचे वाहनावरील संतुलन बिघडून अपघातास निमंत्रण मिळत आहे. आतापर्यंत अनेक दुचाकींचे येथे अपघात झाले असून, याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे. दरम्यान, या संदर्भात मुख्याधिकारी अशिष लोकरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी भ्रमणध्वनी उचलला नाही. यामुळे त्यांची बाजू समजू शकली नाही.
कोट.......
आठवडी बाजाराकडून शुक्रवार पेठकडे जाणारा मार्ग हा रहदारीचा असून, या मार्गावरून भाविकांच्या वाहनांचीही सतत रेलचेल असते. याच मार्गावर प्राधिकरणाच्या माध्यमातून सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याचे काम करण्यात आले. मात्र, या रस्त्याच्या मध्यभागीच मोठी भेग पडल्याने अनेक वेळा दुचाकीचे अपघात होत आहेत. ही बाब लोकप्रतिनिधींना तोंडी सांगूनही त्यांनीही दुर्लक्ष केले आहे. गेल्या वर्षी खाली डांबर टाकून ही भेग बुजविण्याचा प्रयत्न झाला, परंतु ते डांबर निघून गेले आहे.
- विजय भोसले, नागरिक
या मार्गावर भेगा पडल्याने अनेक वेळा दुचाकीचे अपघात घडले आहेत. त्यामुळे पालिकेने तत्काळ या रस्त्याची दुरुस्ती करून येऊन पुढे अपघात घडणार नाहीत, याची खबरदारी घ्यावी, तसेच ज्यांचे या मार्गावरून जाताना अपघात घडले आहेत, त्यांना नुकसान भरपाईही द्यावी.
- राहुल खपले, नगरसेवक