रस्ते झाले; नाल्यांअभावी रहिवाशांची गैरसोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:33 AM2021-02-24T04:33:36+5:302021-02-24T04:33:36+5:30
लोहारा : लोहारा शहरातील प्रभाग क्रमाक सात म्हणजे भूकंपानंतर नवीन जागेवर वसलेला भाग यामुळे गेल्या २८ वर्षांपासून येथे मूलभूत ...
लोहारा : लोहारा शहरातील प्रभाग क्रमाक सात म्हणजे भूकंपानंतर नवीन जागेवर वसलेला भाग यामुळे गेल्या २८ वर्षांपासून येथे मूलभूत सोयी-सुविधांचा अभाव होता. दरम्यान, सध्या येथील रस्त्याचा प्रश्न मार्गी लागत असला तरी अद्याप नाल्या तसेच काही भागात विजेच्या खांबाचा प्रश्न कायम आहे.
लोहारा शहरातील प्रभाग क्रमाक सातमध्ये गुरु बंगले प्लॉटींग, विठ्ठल-रूक्मिणी मंदिर, अहिल्याबाई होळकर चौक, सुधाकर डोकडे घर ते डॉ. हंगरगे दवाखाना, किरण टेलर, चाँद हेड्डे दुकान असा भाग येतो. हा भाग म्हणजे भूकंपानंतर झालेली नवीन वसाहत आहे. यामुळे येथे मूलभूत सुविधेचा अभाव होता. ग्रामपंचायत अस्तित्वात असताना लाईट, पाण्याची सोय करण्याचा प्रयत्न झाला; परंतु रस्ते, नाल्यांकडे दुर्लक्ष झाले. ग्रामपंचायतीला नगरपंचायतचा दर्जा मिळाल्यानंतर मूलभूत सोयी-सुविधा मिळतील, अशी आशा नागरिकांना होती. त्यानुसार मागील पाच वर्षात या प्रभागात गुरु बंगले ते दिलीप माशाळकर घर दोन्ही बाजूने नाल्याची कामे झाली. याशिवाय याच प्रभागातून जाणारा उंडरगाव रस्ता डांबरीकरण, विठ्ठल रूक्माई मंदिर ते चाँद हेड्डे, सुधाकर डोकडे घर, जिंदावली शेख घर ते माशाळकर दुकान, दगडू तिगाडे घर या उभ्या रस्त्याचे व वाले घर ते मनियार घर आडव्या सिमेंट रस्त्याच्या कामासदेखील मंजुरी मिळून हे काम सुरूही झाले. या ठिकाणी मुरूम टाकून दबाई करण्यात आली असून, सिमेंट रस्त्याच्या कामास मात्र अद्याप सुरुवात झालेली नाही. या भागातील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी आ. ज्ञानराज चौगुले यांच्या आमदार निधीतून बोअर घेण्यात आले आहे.
दरम्यान, या भगाात नाल्यांचा प्रश्नही बिकट आहे. बहुतेक रस्त्याच्या कडेला नाल्या नसल्याने सांडपाणी रस्त्यावर येत आहे. गणेश खबुले तसेच धनू बाबळे ते डोकडे यांच्या घरापर्यंत विजेचे खांब नाहीत. त्यामुळे या भागातील नागरिकांना दुरवर असलेल्या खांबावरून वीज कनेक्शन घ्यावे लागते. त्यामुळे या भागातील विजेचा प्रश्नही मार्गी लागावा, अशी मागणी होत आहे.
कोट...........
प्रभाग ७ मध्ये बहुतांश शेतकरी बांधव व पशुपालक राहतात. या भागात नाल्या तसेच रस्त्याची कामे होणे गरजेचे आहे. गणेश खबुले यांच्या घराच्या परिसरातील बहुतांश लोकांना विद्युत कनेक्शनसाठी २०० ते ४०० फुटावरून वायर टाकून विद्युत जोडणी करून घ्यावी लागते. त्या ठिकाणी विजेच्या खांबाची आवश्यकता आहे.
- शामल बळीराम माळी, रहिवासी
प्रभाग क्रमाक सात हा भूकंपानंतर नवीन जागेत वसलेला भाग आहे. त्यामुळे येथे मूलभूत सुविधांचा अभाव असून, त्यात रस्त्याचा प्रश्न सुटत असला तरी नाल्यांचा प्रश्न कायम आहे. नाल्याचे पाणी रस्त्यावर येत असल्याने दुर्गंधी पसरत आहे. याकडे नगरपंचायत प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.
- दगडू तिगाडे, रहिवासी.
या प्रभागात मूलभूत सोयी-सुविधांचा अभाव होता. सध्या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावला आहे. शिवाय विठ्ठल-रूक्मिणी मंदिरासमोर आ. ज्ञानराज चौगुले यांच्या आमदार निधीतून बोअर घेतल्याने पाण्याचा प्रश्नही सुटला आहे. आता नाल्यांचा प्रश्न बाकी असून, त्यासाठीही पाठपुरावा सुरू आहे. विद्युत खांबाचा प्रश्नही लवकरच मार्गी लागेल.
- कमल राम भरारे, नगरसेविका.
फोटो - लोहारा शहरातील प्रभाग क्रमांक सातमध्ये बंगले दुकान ते जिदावली शेख घराकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली असून, बाजूने नाल्याही नाहीत.