साहित्यिकांची भूमिका हुजऱ्याची नव्हे, द्रष्ट्याची
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2020 04:07 AM2020-01-11T04:07:37+5:302020-01-11T04:07:52+5:30
मराठवाडा ही संतांची भूमी. इथल्या मातीचा प्रत्येक कण आणि कण संतांच्या पदस्पर्शाने पुनीत आणि पावन झालेला आहे. उस्मानाबाद जिल्ह्याचा ...
मराठवाडा ही संतांची भूमी. इथल्या मातीचा प्रत्येक कण आणि कण संतांच्या पदस्पर्शाने पुनीत आणि पावन झालेला आहे. उस्मानाबाद जिल्ह्याचा भाग असलेले लातूर ही राष्ट्रकूट राजांची जन्मभूमी ! ऐतिहासिक आणि ज्ञात कालखंडाचा विचार करता मौर्य काळात उस्मानाबाद जिल्ह्याचा परिसर सम्राट अशोकांच्या आधिपत्याखाली होता. अलीकडच्या काळात १९०५ मध्ये लोकमान्य टिळकांनी उस्मानाबाद शहराला भेट देऊन वाचनालयाची स्थापना केली. १९४१ साली भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जिल्ह्याला भेट देऊन शिकण्याचा आणि संघर्ष करण्याचा संदेश दिला. उस्मानाबादच्या पदरी असे किती तरी पुण्य आहे. संत गोरा कुंभार यांच्या वास्तव्याने मराठवाड्याची ही भूमी पावन झाली आहे.
साहित्याचे प्रयोजन : समाजाची सुख-दु:खे आशा-आकांक्षा, वेदना-व्यथा आणि जे-जे मानवी आहे, मानवाच्या इतिहासाशी आणि वर्तमानाशी निगडीत आहे, त्या सर्वांचे प्रतिबिंब साहित्यिकाच्या हृदयात उमटते व ते त्याच्या लेखनातून व्यक्त होते.
राजकारण ही लोकशाहीतील महत्त्वाची प्रक्रिया आहे. ह्या प्रक्रियेपासून साहित्यिक अलिप्त राहू शकत नाहीत. जेव्हा लोकशाहीच्या नावाखाली हुकूमशाही प्रवृत्ती अवतरते तेव्हा साहित्यिकांनी स्पष्ट बोलले पाहिजे आणि लिहिले पाहिजे. जेव्हा समाजात असाधारण परिस्थिती निर्माण होते, जेव्हा हुकूमशहा आणि लष्करशहा ह्यांचा उदय होतो, जेव्हा मानवी हक्क, प्रतिष्ठा आणि जीवन पायदळी तुडविले जाते, तेव्हा साहित्यिक, विचावंत, धर्माचार्य ह्या सर्वांनी एखाद्या द्रष्ट्याप्रमाणे स्पष्ट भूमिका घेतली पाहिजे.
अभिव्यक्ती स्वातंत्र्य : आपल्या संविधानातील उद्देशिका (प्रीअँबल) म्हणजे एक महाकाव्यच आहे. भारत हे बहुवांशिक, बहुधार्मिक, बहुसांस्कृतिक, बहुभाषिक राष्ट्र आहे. विविधतेतील ही एकता आपण जपली आणि जोपासली आहे. घटनेनेही ती मान्य केली आहे. जगात हीच आपली ओळख आणि अस्मिता आहे. लोकशाही एक जीवंत वस्तुस्थिती आहे. जीवंत व्यक्तीला आजार होतात, त्याप्रमाणे लोकशाहीलाही आजार होऊ शकतो. तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी आणीबाणी जाहीर केली. त्याआधी भ्रष्टाचार विरोधी चळवळीमध्ये लोकनेते जयप्रकाश नारायण यांनी लष्कराला कायदेभंग करण्याचा सल्ला दिला, तोही घातक होता. लोकशाहीच्या बुरख्याखाली एकाधिकारशाही नांदू शकते आणि आणीबाणी न लादताही लोकशाहीचा गळा घोटता येतो. असे जेव्हा-जेव्हा घडते, तेंव्हा स्वातंत्र्यप्रिय नागरिकांनी विशेषत: साहित्यिकांनी, विचारवंतांनी सजग राहून भूमिका घेतली पाहिजे.
कुणाच्या ताटात काय आहे, ह्यावर एखाद्याचे जगणे किंवा मरणे अवलंबून नसावे. गायीच्या नावाने विशिष्ट समाजातील व्यक्तींच्या हत्या करण्यात आल्या आहेत. स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर ह्यांनी गायीविषयीची केलेली चिकित्सा अतिशय पुरोगामी आहे. गाय जगली पाहिजे, तसा माणूसही जगला पाहिजे. म्हणून गायीच्या नावाने केलेल्या हत्या हा सावरकारांच्या विचारांचा केलेला पराभव आहे. देशभरात झालेल्या २०८ पत्रकारांच्या हत्या सुध्दा निषेधार्ह आहेत. विभूतिपूजन, पोथीनिष्ठा, कर्मठपणा वाढत आहे. दडपणांमुळे शास्त्रशुध्द संशोधन आणि धर्मचिकित्सा करणे अवघड होते. प्रत्येक धर्माचे धर्मग्रंथ आहेत, त्या धर्मग्रंथांना काळाचा आणि तत्कालीन संस्कृतीचा संदर्भ आहे. धर्मग्रंथांतील काही वचने कालबाह्य होऊ शकतात. त्या वचनांमुळे मानवी स्वातंत्र्याचे, प्रतिष्ठेचे आणि हक्कांचे उल्लंघन होऊ शकते. धर्मग्रंथातील अशा वचनांची शास्त्रशुद्ध चिकित्सा झाली पाहिजे, आणि ती चिकित्सा त्या-त्या धर्मातील धर्मपंडितांनी केलेली उत्तम.
फ्रेंच विचारवंत व्हॉल्टेअरचे एक वचन उद्बोधक आहे. ‘तू जे बोलतोस ते मला मान्य नाही, तथापि तुला तुझी भूमिका मांडता यावी म्हणून मी माझ्या रक्ताचा शेवटचा थेंब शिल्लक असेपर्यंत लढत राहीन.’ अशा वातावरणातच लोकशाही मूल्यांचे संवर्धन होत असते. मूलतत्त्ववादाने जगभर आपले विद्रुप डोके वर काढले आहे. अहिंसा परमो धर्म: ही आपल्या देशाची शिकवण आहे. संत तुकाराम म्हणतात, ‘कुणाही जिवाचा न घडो मत्सर’. प्रभू येशूने क्षमा धर्माचा पुरस्कार केला.
मातृभाषेस जिवे मारीले? : मराठी माय मरो नि इंग्रजी मावशी जगो, असेच जणू आपण ठरवले आहे. इंग्रजी ही जागतिक संपर्काची भाषा आहे. तिच्यावर निश्चितच प्रभुत्त्व मिळवावे. आजच्या परिस्थितीत फ्रेंच, जर्मन, जपानी अशा इतर परदेशी भाषाही शिकाव्यात. इंग्रजी अथवा कोणत्याही भाषेचा दुस्वास करणे अयोग्य आहे. बहुभाषिक असणे ही आधुनिक काळाची गरज आहे. परंतु, प्रत्येक लोकसमुहाचे सांस्कृतिक संचित असते. रितीभाती, सण-सोहळे, भाव-भावना असतात. त्यांचा आविष्कार त्या-त्या लोकसमुदायाच्या मातृभाषेतून होत असतो. ब्रिटीश पत्रकार मार्क टली सांगतात, ‘तुम्हाला एखादा समाज नष्ट करायचा असेल तर त्याची मातृभाषा नष्ट करा’. मायबोलीची हेळसांड करून आपण निराळे काय करीत आहोत? मायबोलीवर कसे प्रेम करावे, हे गोव्यातील कोकणी भाषक लोकांकडून आपण शिकू शकतो. वयाच्या सातव्या वर्षापर्यंत जे संस्कार होतात, ते धन आयुष्यभर पुरत असते. ह्याच वयात मातृभाषेचा संस्कार झाला पाहिजे. ह्याची जाणीव जगात सर्वत्र आहे. म्हणून मूठभर आशियाई देश सोडले तर सर्वत्र मायबोली हेच शिक्षणाचे माध्यम आहे. तिथे दुय्यम भाषा म्हणून अन्य भाषा आवडीने शिकवल्या आणि शिकल्या जातात.
युरोपात खाजगी आणि सरकारी शाळांचा दर्जा सारखाच आहे. आपल्याकडे ट्युशन सम्राटांनी शाळेतील उत्तम शिक्षकांना आपल्याकडे ओढले. शिक्षण ही फक्त श्रीमंतांचीच मक्तेदारी बनली आहे. मुलांची स्थितीही आज शर्यतीच्या घोड्यासारखी आहे. कमी गुण मिळालेला मुलगा आयुष्यात आपल्या आवडीच्या क्षेत्रात नाव काढू शकतो. आज खेड्यापाड्यात इंग्रजी शाळांचे लोण पसरत आहे, याचे कारण पुण्या-मुंबईतील उच्चभ्रू समाज आहे. मराठी माध्यमाचा पूर्णपणे त्याग करून इंग्रजी शाळांचा केलेला स्वीकार त्या अर्थाने ते खरे मराठी भाषेचे मारेकरी आहेत. यांची मुले शिकून परदेशी जाणार आणि आमची मुले मात्र खेड्यातच राहणार का? या भयगंडाने इतरांना पछाडले आहे.
मराठीच्या बोली : मराठी भाषा संपन्न करण्यासाठी बोली भाषांचे खूप मोठे भांडार आपल्या पदरी आहे. शुद्ध आणि अशुद्ध असा भेदभाव केल्यामुळे आपल्या बोली अंधारात राहिल्या. मराठी भाषेने आता आपल्या बोली भाषेतून शब्दसंपत्ती स्वीकारण्याची वेळ आलेली आहे. बोली भाषांमधील चपखल प्रतीशब्दांचा स्वीकार करायला हवा. दर दहा मैलांवर बोली भाषा बदलते.
लेखन, अनुवाद आणि प्रकाशन : नवोदित लेखकांची मोठ्या प्रकाशकांपर्यंत जायची हिंमत होत नाही. काही लेखक, कवी उधार-उसनवारी करून पुस्तक प्रकाशित करतात. मात्र, त्या पुस्तकांची विक्री किती झाली याची माहिती त्या बिचाºया लेखकाला नसते. अशा व्यवहारामुळे अनेक संशयास्पद गोष्टी घडतात.
पर्यावरण - श्वासाची लढाई : आज जगाने निरनिराळ्या क्षेत्रात वाखाणण्यासारखी प्रगती केली आहे. परंतु, आपण निसर्गाचे अध्यात्म नाकारले आहे. आपल्याकडे तुकोबांनी म्हटले आहे, ‘वृक्षवल्ली वनचरे आम्हा सोयरे’. मात्र आज आपण ते नाते विसरलेले आहोत. माझे वय ७६ वर्षांचे आहे. या खंडप्राय देशात ग्रेटा थुनबर्गसारखी जन्माला आलेली मुलगी मला पहायची आहे.
सुसंवाद सदा घडो : माझ्या बोलण्यात आणि लेखनात बायबलप्रमाणे संत साहित्यातील संदर्भ सहजपणे येत असतात. त्याचे कारण मला संतांच्या साहित्यामध्ये सापडते. संत तुकारामांचे अभंग अभ्यासताना मी तुकारामांच्या प्रेमात पडलो. आपण भारतात जन्माला आलो, म्हणून हे भाग्य आपल्याला लाभले आहे. २१ व्या शतकात टिकून रहायचे असेल तर सर्व धर्म मैत्री साधणे गरजेचे आहे. ‘भूतां परस्परों पडो, मैत्र जिवांचे’, ही आपल्या सर्वांची भूमिका आहे.
जय जगत्, जय भारत, जय महाराष्ट्र...
>आजघडीला देशाचे खरे शत्रू दुसरा धर्म, दुसरी जात, दुसरा देश नाही, तर बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या, अतिवृष्टी, दुष्काळ, शहर-ग्रामीण वाढत चाललेली दरी, धर्मांधता, आर्थिक क्षेत्रातील घसरण, बंद होत असलेले उद्योगधंदे, लघुउद्योगांवर आलेली संक्रांत ही चिंतेची बाब आहे. अशावेळी साहित्य निर्मितीसाठी लेखकावर कुठल्याही प्रकारची बंधने नकोत. लेखकाला हुजºयाची भूमिका पार पाडायची नसते, तर त्याला द्रष्ट्याच्या भूमिकेत जावे लागते. त्यासाठी अभिव्यक्ती स्वातंत्र्याची नितांत आवश्यकता आहे.
(९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या उद्घाटन सोहळ्यातील लिखित भाषणाचा सारांश...)
>रस्त्यावर उतरून संघर्ष करणारे साहित्यिक
स्वामी अग्निवेश. ते एका धर्मसंघटनेचे अध्यक्ष आहेत. तरीही मानवी हक्कांची पायमल्ली होताच त्यांनी लोकशाही मार्गाने आपला विरोध दर्शविला. ज्ञानपीठ विजेत्या महाश्वेतादेवी या बंगाली लेखिका होत्या. मात्र स्वत:ला अभ्यासिकेत कोंडून न घेता, त्यांनी रस्त्यावर उतरून गोरगरिबांसाठी संघर्ष केला. नयनतारा सहगल या गाजलेल्या लेखिका आहेत. भारतात अलीकडे अनेक प्रकार घडताहेत, ज्यामुळे कायद्याची पायमल्ली होते, लेखनस्वातंत्र्य मर्यादित केले जाते, त्याबद्दल त्या आपले मत स्पष्टपणे मांडत आहेत. त्यामुळे अनेकांना त्यांना