दहा एकर उडदात फिरविला रोटाव्हेटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:31 AM2021-08-29T04:31:34+5:302021-08-29T04:31:34+5:30
जेवळी : पावसाने मोठ्या प्रमाणावर विश्रांती घेतल्याने उडीद पिकांना मोठा फटका बसला असून, लागवडीला काळ ठरणाऱ्या चार हेक्टर उडीद ...
जेवळी : पावसाने मोठ्या प्रमाणावर विश्रांती घेतल्याने उडीद पिकांना मोठा फटका बसला असून, लागवडीला काळ ठरणाऱ्या चार हेक्टर उडीद पिकात लोहारा तालुक्यातील उत्तर जेवळी येथील एका शेतकऱ्याने चक्क रोटाव्हेटर फिरवून पीक मोडीत काढले. त्यामुळे शेतकऱ्याला लाखो रुपयांचा आर्थिक फटका सहन बसला.
जून महिन्याच्या सुरूवातीला पावसाच्या आगमनाने काही शेतकऱ्यांनी पेरणी केली. या पावसावर जेवळी व परिसरात साधारण वीस टक्के पेरणी झाली. मात्र, कमी ओलीमुळे ८० टक्के शेतकरी जुलै महिन्यात पडलेल्या दमदार पावसानंतर पेरणी केली. पेरणीयोग्य पावसाने यावर्षी शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. परंतु, हा आनंद शेतकऱ्यांना फार काळ राहिला नाही. जुलै महिन्यातील दमदार आगमनानंतर पावसाने महिनाभरापासून या परिसरात चक्क दडी मारली आहे. दिवसभर कडक ऊन पडल्याने शेतकऱ्यांचे नगदी पीक म्हणून ओळखले जाणारे उडीद, मूग आणि सोयाबीन पिके रानात जागेवर करपून गेली.
नगदी पीक असलेल्या उडीद पिकावरील शेतकऱ्यांच्या अपेक्षा आता संपल्या आहेत. उत्पन्नापेक्षा खर्चाचा हिशोब दुप्पट दिसत असल्याने उत्तर जेवळी येथील शेतकरी कल्याणी संभाजी घोडके यांनी आपल्या दहा एकर क्षेत्रावर असलेल्या उडीद पिकात चक्क रोटाव्हेटर फिरवून पीक मोडीत काढले. यामुळे शेतकऱ्यांला लाखो रुपयांचा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.
कोट.......
दहा एकर क्षेत्रावर जुलैमध्ये उडदाची पेरणी केली होती. पेरणीनंतर पावसाने हुलकावणी दिल्याने पिकांचे कंबरडे मोडले. तब्बल महिना होवून गेला तरी पावसाचा पत्ता नाही. त्यामुळे फुलांच्या मोसमात संपूर्ण फुलगळ होऊन दोन-चार शेंगा आहेत. त्याची रास करणे परवडणारे नाही. पुढील होणारे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी संपूर्ण उडीद पिकावरती रोटाव्हेटर मारावे लागले.
- कल्याणी संभाजी घोडके, शेतकरी