साहेब येतील की नुकसान पाहायला...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:39 AM2021-09-10T04:39:39+5:302021-09-10T04:39:39+5:30
उस्मानाबाद - मागील पाच सहा दिवसात वरूण राजाची एवढी कृपा झाली की, पावसाळ्यातील तीन महिन्याचा ‘बॅकलॉक’ भरून काढला. एकेका ...
उस्मानाबाद - मागील पाच सहा दिवसात वरूण राजाची एवढी कृपा झाली की, पावसाळ्यातील तीन महिन्याचा ‘बॅकलॉक’ भरून काढला. एकेका मंडळात दोन ते तीन वेळा अतिवृष्टी झाल्याने काढणीला आलेला उडीद, मूग तसेच सोयाबीनचे होत्याचे नव्हते झाले. मागील अनुभव गाठीशी असल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी पिके विमा संरक्षित केली. विमा कंपनीच्या दंडकानुसार ७२ तासांत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी कंपनीला कळविणे बंधनकारक आहे. मात्र, अनेक शेतकरी यापासून अनभिज्ञ आहेत. ‘तलाठी व कृषी खात्याचे साहेब पाहणीसाठी येतील’ या आशेवर ते आहेत. तर काहींचा गोंधळ उडाला आहे. ई-पीक नोंदणी आणि नुकसान भरपाईसाठीची नोंदणी एकच असल्याचा त्यांचा समज झाला आहे. त्यामुळे असे शेतकरी ई-पीक नोंदणी नव्हे तर, नुकसान भरपाईच्या नोंदणीसाठी १५ सप्टेंबर ही शेवटची तारीख असल्याचे समजून बसले आहेत.
पूर्वी पावसाने खंड दिल्याने अथवा अतिवृष्टी झाल्याने पिकांचे नुकसान झाल्यास कृषी, तलाठी कार्यालयाचे कर्मचारी बांधावर जाऊन पंचनामे करीत. परंतु, आता विमा कंपन्यांनी आशा स्वरूपाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांनी ७२ तासांत ऑनलाईन नोंदणी करणे वा कंपनीला टोल फ्री क्रमांकावर कळविणे बंधनकारक केले आहे. जिल्ह्यात मागील पाच- सहा दिवसात झालेल्या पावसामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांचा काढणी झालेला उडीद, मूग वाहून गेला. गंजी लावून ठेवलेल्यास मोड आले. तर काहींची पिके पाण्याखाली गेली. त्यामुळे या शेतकऱ्यांनी ७२ तासांत नोंदणी करणे विमा कंपनीच्या नियमानुसार बांधनकारक आहे. मात्र, माहिती नसलेले, अशिक्षित आणि ॲड्रॉईड मोबाईल सारखी साधने नसणारे शेतकरी आजही ‘नुकसानीची पाहणी करण्यासाठी साहेब येतील ’ या आशेवर आहेत. तर काहींमध्ये चुकीचा समज निर्माण झाला आहे. सध्या ई-पीक नोंदणी सुरू आहे. त्यासाठी १५ सप्टेंबर ही शेवटची तारीख आहे. या नोंदणीलाच नुकसान भरपाईची नोंदणी समजून अनेकजण १५ तारखेपर्यंत वेळ आहे, असे सांगताहेत. त्यामुळे नुकसान होऊन ही विमा कंपनीकडे नोंद न केलेल्या शेतकऱ्यांना फटका बसणार हे निश्चित !
चौकट....
कृषिचे गावस्तरावरील कर्मचारी करताहेत काय? विमा कंपनीकडे नोंदणी न केल्याने मागील वर्षी हजारो शेतकरी भरपाईपासून वंचित राहिले. हा अनुभव गाठीशी असतानाही फारशी सुधारणा झाल्याचे दिसत नाही. अनेक मंडळात दोन ते तीन वेळा अतिवृष्टी झाली आहे.त्यामुळे अशा भागात जाऊन अधिकाधिक शेतकऱ्यांची नोंदणी करून घेणे गरजेचे होते.परंतु, 'आम्ही गावात सांगीतले आहे. व्हाट्सअप ग्रुपवर आवाहन केले आहे' अशी उत्तरे देऊन कृषिचे अनेक कर्मचारी मोकळे झाले.
विमा कंपनीचा फायदाच फायदा....
कृषी विभागाच्या दुर्लक्षित कारभाराचा शेतकर्यांना फटका बसणार आहे. तर विमा कंपनीच्या फायद्यात भर पडणार आहे. याबाबत तातडीने पाऊले उचलण्याची गरज व्यक्त होत आहे.