शेतीसाठी वृध्दाचा खून करून प्रेत जाळले; वाशी तालुक्यातील इसपुर येथील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 03:46 PM2018-02-16T15:46:11+5:302018-02-16T15:49:46+5:30
सिलिंगमध्ये मिळालेल्या शेत जमिनीतील हिस्स्याच्या कारणावरून एका ६२ वर्षीय वृध्दाचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी प्रेत जाळल्याची घटना तालुक्यातील इसरूप शिवारात बुधवारी मध्यरात्री घडली.
वाशी (उस्मानाबाद) : सिलिंगमध्ये मिळालेल्या शेत जमिनीतील हिस्स्याच्या कारणावरून एका ६२ वर्षीय वृध्दाचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी प्रेत जाळल्याची घटना तालुक्यातील इसरूप शिवारात बुधवारी मध्यरात्री घडली. या प्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात गुरूवारी रात्री चौघाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
वाशी तालुक्यातील इसरूप येथील मुरलीधर बापू कांबळे (६२) यांचा शेतातील गोठ्याजवळील तुराट्या पेटल्याने जळून मृत्यू झाल्याचा प्रकार गुरूवारी सकाळी समोर आला होता़ या प्रकरणात प्रारंभी वाशी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती़ घटनास्थळी दाखल झालेले पोनि दिनकर डंबाळे यांना घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर या प्रकाराबाबत संशय आला़ घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ़ सिध्देश्वर धुमाळ यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली़ तसेच अधिकारी, कर्मचा-यांना तपासाबाबत सूचना दिल्या़ घटनास्थळी दाखल श्वान पथक, आयबाईट पथकाने पाहणी करून वरिष्ठांना अहवाल सादर केला़
या प्रकरणात मयताचा मुलगा शंकर मुरलीधर कांबळे यांनी वाशी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे़ या फिर्यादीत म्हटले की, मुरलीधर कांबळे यांना सिलिंगमध्ये काही जमीन मिळाली होती. ‘ही जमीन वाटून दे’ असे म्हणून भारत बारीकराव कांबळे, बारीकराव शिवाजी कांबळे (दोघे रा. इसरूप), उत्रेश्वर श्रीरंग कांबळे व परमेश्वर श्रीरंग कांबळे (दोघे रा. साठेनगर,हल्ली मुक्काम मानखुर्द मुंबई) यांनी बुधवारी १५ फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास शेतातील गोठ्याजवळ मुरलीधर कांबळे यांचे पाय बायडिंगवायरने बांधून जीवे मारले़ तसेच पुरावा नष्ट करण्याच्या मागणीसाठी प्रेत जाळल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या फिर्यादीवरून भारत कांबळे, बारीकराव कांबळे, उत्रेश्वर कांबळे, परमेश्वर कांबळे या चौघांविरूध्द वाशी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ अधिक तपास पोउपनि मोतीराम बगाड हे करीत आहेत़ दरम्यान, गुन्हा दाखल होताच वाशी पोलिसांनी भारत कांबळे व बारीकराव कांबळे या दोघांना गजाआड केले आहे. इतर दोघांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले़