‘नवनित’च्या छायाप्रतींची विक्री रंगेहात पकडली; काॅपीराईट कायद्यानुसार गुन्हा दाखल
By बाबुराव चव्हाण | Updated: January 11, 2024 18:10 IST2024-01-11T18:10:05+5:302024-01-11T18:10:37+5:30
काॅपीराईट असलेल्या पुस्तकांच्या पीडीएफ फाईल संगणकावर सेव्ह

‘नवनित’च्या छायाप्रतींची विक्री रंगेहात पकडली; काॅपीराईट कायद्यानुसार गुन्हा दाखल
धाराशिव : नवनित एज्युकेशन लिमिटेड मुंबई यांचे काॅपीराईट असलेल्या पुस्तकांचे त्यांच्या परवानगीशिवाय पीडीएफ फाईलच्या सहाय्याने झेराॅक्स काढून त्याची विक्री करताना ३३ वर्षीय व्यक्तीस बुधवारी दुपारी अडीच वाजता रंगेहात पकडले. स्पाॅटवरून साहित्य तसेच राेख ५० हजार ७४० रूपये जप्त करण्यात आले. या प्रकरणी धाराशिव शहर पाेलीस ठाण्यात संबंधिताविरूद्ध गुन्हा नाेंद झाला आहे.
धाराशिव तालुक्यातील महादेववाडी येथील रहिवासी गणपती साेमनाथ वाघे (३३) यांनी बुधवारी दुपारी अडीच ते तीन या वेळेत राेहन झेराॅक्स येथे नवनित एज्युकेशन लिमिटेड मुंबई यांचे काॅपीराईट असलेल्या पुस्तकांचे त्यांच्या परवानगीशिवाय स्वत:च्या फायद्यासाठी पीडीएफ फाईल आपल्या संगणकावर सेव्ह करून घेतली. यानंतर संबंधित पुस्तकाच्या मागणीनुसार झेराॅक्स काढून खुलेआम विक्री केली जात हाेती.
ही माहिती मिळताच कंपनीच्या अधिकाऱ्यांनी तिथे जावून कारवाई करण्यात आली असता, साहित्यासाेबतच वाघे याच्याकडे तब्बल ५० हजार ७४० रूपये आढळून आले. या प्रकरणी सुशांत सर्जेराव पाटील यांनी बुधवारी धाराशिव शहर पाेलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यावरून गणपती वाघे याच्याविरूद्ध काॅपीराईट कायदा १९५७ चे कलम ६३, ६४ अन्वये गुन्हा दाखल झाला आहे. प्रकरणाचा अधिक तपास धाराशिव शहर पाेलीस करीत आहेत.