जादा दराने बियाणे-खत विक्री, ‘व्हाॅटस्ॲप’द्वारे करा तक्रार; धाराशिवमध्ये १० परवाने निलंबित
By बाबुराव चव्हाण | Published: June 1, 2023 06:50 PM2023-06-01T18:50:08+5:302023-06-01T18:50:32+5:30
शेतकऱ्यांची लुबाडणूक; जादा दराने खताची विक्री, साठाही जुळेना !
धाराशिव - खरीप पेरणीपूर्वीच जिल्ह्यातील काही कृषी दुकानदारांकडून जादा दराने खत शेतकऱ्यांच्या माथी मारून आर्थिक लुबाडणूक केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार ‘कृषी’च्या झाडाझडतीतून समाेर आला आहे. अशा १० दुकानदारांना परवाना निलंबनाचा दणका दिला आहे. तर तिघांना ताकीद दिली. जिल्हास्तरावरील तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आला असून ‘व्हाॅटस्ॲप’द्वारे देखील तक्रार दाखल करता येणार आहे.
खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना निर्धारित दरात खत, बी-बियाणे मिळावे, यासाठी कृषी विभागाकडून जिल्हाभरातील कृषी दुकानांची झाडाझडती सुरू करण्यात आली आहे. या तपासणीत अनेक धक्कादायक बाबी समाेर आल्या आहेत. काही विक्रेत्यांनी निर्धारित किंमतीपेक्षा जादा दराने खत शेतकर्यांच्या माथी मारले आहे. काहींकडील उपलब्ध खत आणि ई-पाॅश मशीनवरील साठा जुळत नाही. तर काहींनी परवान्यात समाविष्ट असलेल्या स्त्राेतांशिवाय इतरांकडून निविष्ठा खरेदी केल्या आहेत. काहींनी तर आपल्याकडे किती खत शिल्लक आहे? ते काेणत्या प्रकारचे आहे? किती विक्री झाले आहे? अशी कुठलीही नाेंद साठा रजिस्टरला केलेली नाही. खत खरेदी केल्यानंतर शेतकर्यांना विहित नमुन्यातील पावत्याही दिल्या नाहीत. हे धक्कादायक प्रकार पाहून आता कृषी विभाग ॲक्शन माेडवर गेला आहे. संबंधित १० विक्रेत्यांविरूद्ध परवाना निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तर तिघा विक्रेत्यांना सक्त ताकीद दिली आहे. या कारवाईमुळे नियमांना धाब्यावर बसविणारे विक्रेते धास्तावले आहेत.
तुळजापुरात सर्वाधिक गैरप्रकार...
कृषी विभागाने कारवाई केलेल्या १० पैकी ५० टक्क्यांहून अधिक म्हणजेच सहा विक्रेते हे एकट्या तुळजापूर तालुक्यातील आहेत. यानंतर भूमचा क्रमांक लागताे. येथील ३ विक्रेत्यांवर बडगा उगारला आहे. तर लाेहार्यातील एका विक्रेत्याचा समावेश आहे. दरम्यान, ताकिद दिलेल्यांत भूममधील दाेन तर उमरग्यातील एकाचा समावेश आहे.
‘व्हाॅटस्ॲप’द्वारे करा तक्रार
निविष्ठा उपलब्धतेच्या व दराच्या अनुषंगाने तक्रारीचे निराकरण करण्यासाठी जिल्हा व तालुकास्तरावर तक्रार निवारण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. जिल्हास्तरावरील तक्रार निवारण कक्षाचा संपर्क क्रमांक ०२४७२-२२२३७९४ असा असून यावर ‘व्हाॅटस्ॲप’द्वारे देखील तक्रार स्विकारली जाणार आहे.
-रवींद्र माने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.