समर्थला हवीय साथ; बिकट आर्थिक स्थितीमुळे कामगाराच्या मुलाचा मेडिकल प्रवेश अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2022 06:55 PM2022-02-05T18:55:21+5:302022-02-05T18:56:27+5:30
नीट परीक्षेत ६२५ गुण - पुणे येथील ‘बीजेएमसी’ मेडिकल काॅलेजमध्ये प्रवेश निश्चित
उस्मानाबाद - दुकानामध्ये काम करून कुटुंबाचा गाडा हाकणा-या कामगाराच्या मुलाने आपल्या कुटुंबीयांच्या कष्टाचे चिज केले. मेडिकल प्रवेश पात्रतेसाठी देशपातळीवर घेण्यात आलेल्या नीट परीक्षेत ६२५ गुण घेतले. पुणे येथील ‘बीजेएमसी’ मेडिकल काॅलेजमध्ये प्रवेशही निश्चित झाला. हा आनंद समर्थसह त्याचे वडील राजेंद्र पाटील यांच्या चेहऱ्यावर ठळकपणे दिसत हाेता. मात्र, दुसरीकडे ‘एमबीबीएस’ शिक्षणासाठी वर्षाकाठी लागणारे सव्वा ते दीड लाख रुपये आणायचे काेठून? ही विवंचनाही त्यांच्या बाेलण्यातून जाणवत हाेती. पैशांअभावी समर्थचा मेडिकल प्रवेशच अडचणीत सापडला आहे. त्यामुळे समर्थच्या मदतीसाठी आता समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे येण्याची गरज आहे.
उस्मानाबाद शहराला लागूनच असलेले खानापूर हे समर्थ राजेंद्र पाटील याचे गाव. प्राथमिक शिक्षण उस्मानाबादेतच झाले. शहरातीलच छत्रपती शिवाजी विद्यालयातून दहावीची परीक्षा दिली. बेताची आर्थिक स्थिती आणि वडिलांच्या कष्टाची जाण असलेल्या समर्थने दहावी परीक्षेत ९७ टक्के गुण घेतले. लातूर येथील शाहू काॅलेजमध्ये त्याचा अकरावीच्या वर्गासाठी प्रवेश निश्चित झाला. आपण दुकानात कामगार असलाे तरी मुलांना दर्जेदार शिक्षण देण्याचा निर्धार राजेंद्र पाटील यांनी केला हाेता. त्यामुळेच त्यांनी आर्थिक स्थितीचा विचार न करता लातूर येथे स्थायिक हाेण्याचा निर्णय घेतला. तिथे गेल्यानंतरही त्यांनी एका ड्रायफ्रुटच्या दुकानात कामगार म्हणून काम सुरू केले.
यातून महिन्याकाठी जेमतेम नऊ ते दहा हजार रुपये हाती पडत हाेते. याच पैशातून कुटुंबाचा गाडा हाकण्यासाेबतच मुलांच्या शिक्षणाचा खर्च ते भागवित. आपले वडील राबराब राबून शिक्षणासाठी पैसे पुरवितात, ही जाण समर्थला हाेती. त्यामुळे त्याने कधीच खासगी क्लासेसचा डाेक्यात विचारही विचारही येऊ दिला नाही. जिद्द आणि चिकाटीच्या बळावर बारावीच्या परीक्षेत ८२ टक्के गुण घेतले. बिकट आर्थिक स्थितीमुळे न डगमगता समर्थने देशपातळीवरील नीट परीक्षेचा अभ्यास सुरू ठेवला. याही परीक्षेत त्याने तब्बल ६२५ गुण घेतले आणि वडिलांचे कष्ट सार्थकी लागले. या गुणांच्या बळावर पुणे येथील ‘बीजेएमसी’ मेडिकल काॅलेजमध्ये त्याचा ‘एमबीबीएस’साठी प्रवेशही निश्चित झाला. मात्र, या शिक्षणासाठी प्रतिवर्ष लागणारे सव्वा ते दीड लाख रुपये आणायचे काेठून, हा प्रश्न कुटुंबीयांसमाेर आहे. त्यामुळे आता समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे येण्याची गरज आहे.
समर्थला हवाय मदतीचा हात...
आर्थिक परिस्थतीचा बाऊ न करता, जिद्द आणि कष्टाच्या बळावर समर्थ मेडिकल प्रवेश पात्रतेच्या कसाेटीवर खरा उतराला आहे. आता प्रवेशाच्या उंबरठ्यावर असलेल्या समर्थला ‘एमबीबीएस’ अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी प्रतिवर्ष सव्वा ते दीड लाख आवश्यक आहेत. कामगार म्हणून काम करून महिन्याकाठी जेमतेम नऊ-दहा हजार मिळत असल्याने पैशाचा हा डाेंगर कसा पार करायचा, हा माेठा प्रश्न राजेंद्र पाटील यांच्यासमाेर आहे. या स्थितीत त्यांना मदतीची गरज आहे. समर्थचे वडील राजेंद्र पाटील यांनी डाॅ. दत्तात्रय खुने यांची भेट घेऊन आर्थिक विवंचना मांडली. यानंतर त्यांनी थाेडाही विलंब न करता इंडियन मेडिकल असाेसिएशनच्या उस्मानाबाद शाखेशी चर्चा केली. आणि असाेसिएशनच्या प्रत्येकाने मदतीची तयारी दर्शविली. दाेन दिवसांत मदतीचा आकडा सव्वा लाखापर्यंत गेला आहे. ही रक्कम पुरेशी नाही. त्यामुळे समाजातील अन्य दानशूर व्यक्तींनीही पुढे येण्याची गरज आहे.