एसटी प्रवाशांची तीच ती कारणे !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:23 AM2021-04-29T04:23:54+5:302021-04-29T04:23:54+5:30
उस्मानाबाद : संचारबंदीकाळात अत्यावश्यक सेवेसाठी प्रवाशांना ये-जा करता यावे, यासाठी राज्य परिवहन महामंडळास बससेवा सुरू ठेवण्याच्या सूचना आहेत. मात्र, ...
उस्मानाबाद : संचारबंदीकाळात अत्यावश्यक सेवेसाठी प्रवाशांना ये-जा करता यावे, यासाठी राज्य परिवहन महामंडळास बससेवा सुरू ठेवण्याच्या सूचना आहेत. मात्र, बसला २२ प्रवासी मिळत नसल्याने ब्रेक लागला आहे. बुधवारी केवळ एक बस धावली असून, अत्यावश्यक सेवेसाठी तीच ती कारणे सांगितली जात असल्याचे एसटीकडून सांगण्यात आले.
गतवर्षी लॉकडाऊनमुळे दोन ते अडीच महिने बसची चाके थांबली होती. त्यामुळे एसटी महामंडळाला आर्थिक फटका सहन करावा लागला. त्यानंतर ५० टक्के प्रवासी क्षमतेवर बसेस सुरू झाल्या होत्या. दिवाळीपासून एसटीची वाहतूक पूर्वपदावर येऊ लागली होती. मात्र, एप्रिल महिन्यात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली. त्यामुळे शासनाने १४ एप्रिलपासून कडक निर्बंध लागू करण्यात आले. अत्यावश्यक कारणाशिवाय नागरिकांना विनाकारण घराबाहेर पडण्यास प्रतिबंध लावण्यात आला आहे. मात्र, नातेवाईक आजारी असल्यानंतर त्यांना भेटण्यास, नातेवाइकांच्या अंत्यविधीस जाण्यासाठी तसेच दुर्धर आजाराच्या रुग्णांना रुग्णालयात जाण्यासाठी एसटीची बससेवा सुरू ठेवण्यात आली आहे. परंतु, मागील १४ दिवसांपासून एकाच मार्गावर २२ प्रवासी मिळत नसल्याने बसेस थांबून राहत आहेत. बुधवारी केवळ एक बस अत्यावश्यक सेवेचे प्रवासी घेऊन धावली आहे. अत्यावश्यक सेवेसाठी प्रवाशांकडून साहेब, रुग्णालयात, अंत्यसंस्काराला जातोय. नातेवाईक आजारी आहेत, त्यांना भेटण्यासाठी जातोय, अशी कारणे दिली जात असल्याचे एसटीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
कोणत्याच मार्गावर
गर्दी नाही
कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने शासनाने कडक निर्बंध लागू करण्यात आले. परिणामी, नागरिकही घराबाहेर जाणे टाळत आहेत. अत्यावश्यक सेवेतील प्रवासी बसस्थानकात आले तरी २२ प्रवासी हाेत नसल्याने प्रवाशांना परतावे लागत आहे. त्यामुळे कोणत्याच मार्गावर गर्दी होत नाही.
तीच ती कारणे
संचारबंदीच्या काळात प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी एसटीला शासकीय, निमशासकीय कर्मचारी, दूधविक्रेते, फळ-भाजीविक्रेत्यांना प्रवासास मुभा दिली आहे.
दुर्धर आजाराने ग्रस्त रुग्णांना रुग्णालयात जाण्यासाठी तसेच नातेवाइकांचे आजारपण व अंत्यविधीस जाण्यासाठी नागरिकांना परवानगी आहे.
बसेसला एकाच मार्गावरील २२ प्रवासी मिळत नसल्याने बस दिवसभर डेपोतच थांबून असतात.
बसने प्रवास करताना स्थानकातील आगारप्रमुखांकडे नोंदणी करणे गरजेचे करण्यात आले आहे. त्यात अनेक प्रवासी तीच ती कारणे सांगत आहे.
दररोज ५० लाखांचा फटका
उस्मानाबाद विभागातील सहा आगारांत एकूण ४५० बसेसचा ताफा आहे. लॉकडाऊनपूर्वी या बसेस प्रतिदिन १ लाख ४९ हजार किलोमीटर धावत होत्या. यातून विभागास ५० लाख रुपयांचे उत्पन्न मिळत होते. मात्र, सध्या बसेस बंद असल्याने ५० लाखांचा फटका बसत आहे.
कोट...
संचारबंदी व जिल्हाबंदीमुळे अत्यावश्यक सेवेतील नागरिकांना प्रवास करण्यास मुभा आहे. मात्र, एकाच मार्गावर २२ प्रवासी मिळत नाहीत. त्यामुळे बसेस थांबून आहेत. शासकीय, निमशासकीय कार्यालयांतील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी वेळ निश्चित केल्यानंतर बस सोडणे सोपे होईल, अत्यावश्यक सेवेसाठी प्रवास करण्यासाठी नोंदणी करणे गरजेचे आहे.
पी.एम. पाटील, आगारप्रमुख उस्मानाबाद
पॉइंटर
६ जिल्ह्यातील एकूण आगार
१ बसेस चालविल्या जातात
१८ प्रवास करणाऱ्यांची संख्या