बारा गावांतील ३६ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुमना सर्वेक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:37 AM2021-08-21T04:37:33+5:302021-08-21T04:37:33+5:30
कळंब - मागच्या चार दिवसांत पावसाची अधूनमधून रिमझीम होत असली तरी ऐन फुलोऱ्यात पावसाने प्रदीर्घ विश्रांती घेतल्याने सोयाबीनला झपका ...
कळंब - मागच्या चार दिवसांत पावसाची अधूनमधून रिमझीम होत असली तरी ऐन फुलोऱ्यात पावसाने प्रदीर्घ विश्रांती घेतल्याने सोयाबीनला झपका बसला होता. यासंदर्भात संयुक्त समितीने तालुक्यातील १२ गावांत ३६ शेतकऱ्यांच्या पिकांचे नमुना सर्वेक्षण केले आहे.
यंदा खरिपात पेरा झालेल्या एकूण क्षेत्रात एकट्या सोयाबीनचे क्षेत्र ६० हजार हेक्टरवर असल्याने शेतकऱ्यांची सारी मदार सोयाबीनच्या पिकावर आहे. यामुळे मशागतीसाठी मोठी मेहनत व खर्च केला आहे.यास्थितीत वाढीच्या अवस्थेतून महत्वाच्या अशा फुलोऱ्याच्या अवस्थेत मार्गस्थ होत असलेल्या सोयाबीनच्या पिकाला पावसाने दांडी मारल्याने पाण्याचा असह्य ताण सहन करावा लागला. मागच्या २३ जुलैपासून गायब झाला. त्याचे १५ ऑगस्टपर्यंत चांगले कमबॅक न झाल्याने फुलोऱ्यातून शेंगा लागण्याच्या स्थितीत असलेल्या सोयाबीनची अवस्था गळा दाबल्याप्रमाणे झाली. यातच ढगांची वर्दळ गायब होत उन्हाची तीव्रता वाढली. परिणामी सोयाबीनचे कोठारातील शेतकऱ्यांची अक्षरशः झोप उडाली होती. यापुढील काळात पाऊस झाला तरी फुलोरा, शेंगा गळाल्याने एकरी उत्पादनात मोठी घट धरली जात आहे.
चौकट...
मंडळनिहाय नमुना सर्वेक्षण...
दरम्यान, २३ जुलै ते १३ ऑगस्ट असा कळंब तालुक्यात २१ दिवसांचा पावसात खंड पडला. यामुळे तालुक्यातील सहा महसूल मंडळातील प्रत्येकी दोन याप्रमाणे १२ गावांत नमुना सर्वेक्षण करण्यात आले आहे. या गावाची व शेतकऱ्यांची निवड ‘रॅन्डम बुक’ पुस्तीकेप्रमाणे करण्यात आली आहे.
समितीने घेतले ३६ नमुने
जिल्हाधिकारी, जिल्हा कृषी अधीक्षकांच्या सूचनेनुसार ‘टीओं’च्या अध्यक्षतेखाली महसूल मंडळनिहाय एक या प्रमाणे सहा समित्या स्थापन केल्या होत्या. कृषी पर्यवेक्षक, दोन कृषी सहाय्यक, विमा प्रतिनिधींचा यात समावेश होता. निवडलेल्या गावातील भारी, मध्यम व हलक्या अशा जमिनीच्या प्रतवारीनुसार एकेका पिकाचे सर्वेक्षण करत अहवाल वरिष्ठांना कळवला आहे.
महसूल मंडळनिहाय निवडलेली गावे
इटकूर मंडळातून भोगजी, बोरगाव (ध.), माेहा मंडळातून सातेफळ व खामसवाडी, येरमाळा मंडळातून चाेराखळी, बांगरवाडी, शिराढाेण मंडळातील बाेरगाव (खु.), पाडाेळी, गाेविंदपूरमधून देवळाली, एकुरगा तर कळंब मंडळातून हिंगणगाव, करंजकल्ला या गावांची निवड करण्यात आली आहे.