अवैध वाळू वाहतुकीवर कारवाईसाठी गेलेल्या तलाठ्याला वाळूतस्करांकडून धक्काबुक्की
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2019 07:48 PM2019-01-04T19:48:09+5:302019-01-04T19:49:34+5:30
या प्रकरणी तिघाविरूध्द परंडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़
परंडा (उस्मानाबाद ) : बेकायदेशीर वाळू वाहतूक करणाऱ्यांवर कारवाईसाठी गेलेल्या तलाठ्यांना तस्करांनी धक्काबुक्की केली़ ही घटना गुरूवारी सकाळी तालुक्यातील भोत्रा येथील शाळेजवळ घडली असून, या प्रकरणी तिघाविरूध्द परंडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़
परंडा तालुक्यातील सिना नदीपात्रातून अनधिकृतपणे वाळू उपसा सुरू असल्याची माहिती तहसीदार यांना मिळाली होती़ तहसीलदारांनी दिलेल्या तोंडी सूचनेनुसार डोमगाव सज्जाचे तलाठी मजहर मुबारक जिनेरी व देऊळगावचे तलाठी गवळी हे दोघे गुरूवारी सकाळी कारवाईसाठी गेले़ त्यांनी वाळू वाहतूक करणारा एक ट्रॅक्टर रोसा-भोत्रा रोडवरील जिल्हा परिषद शाळेसमोर थांबविला़ त्यावेळी तिघांनी धक्काबुक्की करून शासकीय कामात अडथळा केला़ तसेच एक ब्रास वाळू असलेला ट्रॅक्टर घेऊन पळ काढल्याची तक्रार तलाठी मजहर जिनेरी यांनी शुक्रवारी परंडा पोलीस ठाण्यात दिली़ जिनेरी यांच्या तक्रारीवरून आश्रु उर्फ रवींद्र गोपीचंद नलावडे (रा़रोसा), नितीन ज्योतीराम जाधव, सुनिल जयवंत नलावडे या तिघांविरूध्द परंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़