सरपंच पतीने मागितली लाच, संशय येताच काढला पळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:35 AM2021-05-20T04:35:09+5:302021-05-20T04:35:09+5:30
तक्रारदार युवकाची उस्मानाबाद तालुक्यातील मेंढा गावच्या शिवारात शेती आहे. यापैकी एका एकरात या तरुणाने शासनाच्या फळबाग योजनेतून शेवग्याचे पीक ...
तक्रारदार युवकाची उस्मानाबाद तालुक्यातील मेंढा गावच्या शिवारात शेती आहे. यापैकी एका एकरात या तरुणाने शासनाच्या फळबाग योजनेतून शेवग्याचे पीक घेतले आहे. या पिकाच्या मशागतीकरिता संबंधित तरुण हा रोजगार मागणी अर्जावर स्वाक्षरी घेण्यासाठी १० मे रोजी सरपंच शशिकला विश्वनाथ कांबळे यांच्याकडे गेला होता. घरामध्ये तेव्हा सरपंच पती विश्वनाथ कांबळे हेही हजर होते. अर्जावर स्वाक्षरी करण्याची विनंती केली असता सरपंच महिलेने पूर्वीच्या ५ मस्टरचे प्रत्येकी १ हजार रुपये याप्रमाणे एकूण ५ हजार रुपये देण्याची मागणी केली. ही रक्कम विश्वनाथ कांबळे यांच्याकडे दिल्यानंतरच अर्जावर स्वाक्षरी करू, असे सांगितले. त्यामुळे तरुणाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत तक्रार केली. उपाधीक्षक प्रशांत संपते यांनी कर्मचारी दिनकर उगलमुगले, इफ्तेखार शेख, पांडुरंग डंबरे, विष्णू बेळे, अविनाश आचार्य, करडे यांच्या मदतीने मंगळवारी सापळा रचला. ठरल्याप्रमाणे तक्रारदार तरुण हा लाचेची रक्कम घेऊन सरपंच पती विश्वनाथ कांबळे यांच्याकडे गेला. मात्र, त्यास संशय आल्याने त्याने रक्कम न स्वीकारताच तेथून काढता पाय घेतला. मात्र, सरपंच व त्यांच्या पतीने लाच मागितल्याचे पुरावे असल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बेंबळी ठाण्यात या दोघांविरुद्ध लाच मागितल्याची तक्रार दिली. त्यानुसार मंगळवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोन्ही आरोपी गायब आहेत. दरम्यान, त्यांचा शोध घेण्यास मदत करून सापडल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे सुपूर्द करावे, अशी विनंती बुधवारी बेंबळी पोलिसांना करण्यात आली आहे.