मणिपूर अत्याचाराच्या निषेधार्थ धाराशिवमध्ये मौन राखून सत्याग्रह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2023 12:58 PM2023-07-23T12:58:55+5:302023-07-23T13:02:04+5:30
धाराशिव शहरातील हुतात्मा स्मारक परिसरात नागरिकांनी तोडाला काळे मास्क बांधून मौन राखून सत्याग्रह आंदोलन केले.
धाराशिव : मणिपूर येथे झालेल्या महिला अत्याचाराचा देशभरात विविध पक्ष संघटनांकडून निषेध नोंदविला जात आहे. रविवारी धाराशिव शहरातील हुतात्मा स्मारक परिसरात नागरिकांनी तोडाला काळे मास्क बांधून मौन राखून सत्याग्रह आंदोलन केले.
मागील तीन महिन्यांपासून मणिपूरमध्ये सुरू असलेली जाळपोळ, हिंसाचार, महिला अत्याचार, सैनिकांवरील हल्ले या मानवतेला काळिमा फासणाऱ्या बाबी आहेत. अशा या देशविघातक घटनांचा निषेध नोंदविण्यासाठी धाराशिव येथील नागरिकांच्या वतीने शहर पोलिस ठाण्याजवळील हुतात्मा स्मारक येथे सकाळी ११.१५ ते दुपारी १२ या कालावधीत मौन राखून सत्याग्रह आंदोलन करण्यात आले.
आंदोलनात आमदार कैलास पाटील, धाराशिव पालिकेचे माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, संजय निंबाळकर, सक्षणा सलगर, प्रतापसिंह पाटील, अग्नीवेश शिंदे, सोमनाथ गुरव, धनजंय शिंगाडे तसेच विविध पक्ष, संघटनांचे पदाधिकारी, व्यापारी, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.