पत्नीला प्रियकरासोबत पाहिले; समाजात बदनामी होत असल्याने पतीने घेतला गळफास
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2022 01:04 PM2022-06-06T13:04:48+5:302022-06-06T13:05:55+5:30
पतीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पत्नीसह विवाहित प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल; पत्नी ताब्यात तर प्रियकर फरार
ढाेकी (जि. उस्मानाबाद) - उस्मानाबाद तालुक्यातील काेंड येथील ३२ वर्षीय तरुणाने स्वतःच्याच शेतात गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना ५ जून राेजी उघडकीस आली. दरम्यान, पतीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पत्नीसह तिच्या विवाहित प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ढाेकी पाेलिसांनी पत्नीस अटक केली तर प्रियकर मात्र फरार झाला आहे.
काेंड येथील सतीश कवरसिंग तिवारी (वय ३२, ह. मु. ढाेकी) यांनी आपल्या शेतातील झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. यानंतर मयताचा भाऊ उमेश कवरसिंग तिवारी यांनी ढाेकी पाेलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. यानुसार मयताची पत्नी स्वाती ठाकूर या ढाेकी प्राथमिक आराेग्य केंद्रात मागील दहा वर्षांपासून परिचारिका म्हणून कार्यरत आहेत. त्या शासकीय निवासस्थानात वास्तव्यास हाेत्या. मयत पती सतीश तिवारी यांनी पत्नी स्वाती आणि तिचा प्रियकर विवेक देशमुख (रा. ढाेकी) या दाेघांना ३१ मेच्या रात्री शासकीय निवासस्थानी एकत्र पाहिले हाेते. यानंतर स्वाती व तिच्या प्रियकराने सतीश यांना बेदम मारहाण केली.
या प्रकरणात सतीशने ढाेकी पाेलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर गुन्हाही नाेंद झाला हाेता. पत्नी स्वाती व प्रियकर विवेक या दाेघांच्या सततच्या त्रासाला व पत्नीच्या अशा वागण्यामुळे हाेत असलेल्या बदनामीला कंटाळून सतीश यांनी शेतातील झाडाला गळफास लावून आत्महत्या केली, असे फिर्यादीत म्हटले आहे. त्यावरून मयताची पत्नी स्वाती व प्रियकर विवेक देशमुख या दाेघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी ढाेकी पाेलीस ठाण्यात गुन्हा नाेंद करण्यात आला आहे. दरम्यान, पाेलिसांनी मयताची पत्नी स्वाती ठाकूर यांना अटक केली तर विवेक देशमुख हा फरार आहे. त्याच्या शाेधासाठी पथक रवाना केले आहे. घटनेचा अधिक तपास पाेलीस उपनिरीक्षक बुधेवार हे करीत आहेत.
निष्पाप मुलांनी हरवला बाप...
जन्मदात्या आईच्या चुकीच्या वागण्यामुळे वडिलांनी गळफास लावून आत्महत्या केली. या प्रकरणात आईला पाेलिसांनी जेरबंद केले. मात्र, निष्पाप सहा वर्षीय सुरक्षा व चार वर्षीय समर्थ या दाेन चिमुकल्यांना वडिलांच्या मायेला मुकावे लागले.